राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी दिली आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होऊ लागलं. भाजपा सोडताना गंभीर आरोप केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांच्या घऱी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर बोलताना एकनाथ खडसे आमचे पालकच असल्याची प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान एकनाथ खडसे यांनीदेखील फडणवीसांच्या या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे. जेवणही माझ्याकडे करायचे… झोपायचेही. देवेंद्र फडणवीस त्या कालखंडात माझ्या बी-४ बंगल्यावर बऱ्याचदा असायचे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणूनही ते माझ्याकडे जळगाववला मुक्ताईनगरला आले होते. माझ्याकडे सूत गिरणीचं, साखर कारखान्याचं उद्घाटन झालं तेव्हा ते येऊन गेले होते”.

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

दरम्यान एकनाथ खडसे यांनी यावेळी वारंवार सरकार पडणार असल्याच्या वक्तव्याच्या समाचार घेत भाजपा नेत्यांना टोला लगावला. “आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

“नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच,” चंद्रकांत पाटलांचं एकनाथ खडसेंबद्दल मोठं विधान

“आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील,” अशी शंका एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे आणि फडणवीसांचं बोलणं झालं –
१ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. रक्षा खडसे यांनी फडणवीसांच्या भेटीबद्दल बोलताना सांगितलं होतं की, “फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp eknath khadse bjp devendra fadanvis jalgaon muktainagar maharashtra government sgy
First published on: 07-06-2021 at 11:51 IST