राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरात जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्यात आलं होतं. या घटनेचे मोठे राजकीय पडसाद उमटले, अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, आता स्वतः हसन मुश्रीफ यांनीचं सोमय्या यांना कोल्हापूरात येण्यापासून अडवलं जाऊ नये अशी विनंती केली आहे. “येत्या मंगळवारी सोमय्या पुन्हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वनियोजित दौऱ्यासाठी येणार आहेत. माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, कोणीही त्यांची अडवणूक करू नये. त्यांना शांततेच्या मार्गाने येऊ द्यावं”, अशी विनंती हसन मुश्रीफ यांनी केली आहे. येत्या मंगळवारी (२८ सप्टेंबर) किरीट सोमय्या हे पुन्हा कोल्हापूरात जाणारा आहे.

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, “किरीट सोमय्या यांनी माझ्यावर दोन कारखान्यांबाबत घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यावेळी कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे सोमय्यांना कोल्हापूरात येण्यापासून प्रतिबंध केला होता. मात्र, येत्या मंगळवारी सोमय्या पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यासाठी कोल्हापूरात येणार आहेत. माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, कोणीही त्यांची अडवणूक करू नये. त्यांना शांततेच्या मार्गाने येऊ द्यावं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कोणतीही कृती करु नका. जे बोलायचं ते त्यांना बोलू द्या.”

टीव्ही बंद करा आणि शेतात जा!

“किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी. सोमय्या यांना जे बोलायचं असेल ते बोलू द्यावं. तुम्हाला ऐकावंस वाटलं नाही तर टीव्ही बंद करा आणि शेतात जा. ते जिथे कुठेही जातील, काहीही बोलतील तर त्यांना बोलू द्या. मी कळकळीचं आवाहन करतो”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

कोणतीही चुकीची वक्तव्य करु नका!

हसन मुश्रीफ यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना देखील एक ही विनंती केली आहे. “किरीट सोमय्या यांनी आपला दौरा संयमाने करावा. त्यांनी सर्वप्रथम आमच्या कामाची माहिती घ्यावी. मी वारंवार सूचना केली आहे की, त्यांनी जिल्ह्यातील आमच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपाची परिस्थितीही त्यांनी पाहावी. त्याचप्रमाणे, त्यांनी यावेळी कोणतीही चुकीची वक्तव्य करु नये”, असं देखील हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.