राज्यात शिंदे-फडणवीस युतीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून सरकारच्या प्रत्येक निर्णयाची किंवा घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे. मग तो नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार असो किंवा खातेवाटप. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही प्रार्थनास्थळांना देखील भेटी दिल्या. यासंदर्भात बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी पूजा-अर्चा करण्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

प्रतिसेनाभवनावरूनही खोचक टीका!

जयंत पाटील यांनी शुक्रवारी माध्यांशी बोलताना शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना भवन बांधलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावरून बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे गटाच्या सूरत, गुवाहाटी, गोवा प्रवासाचा उल्लेख केला होता. “एकनाथ शिंदे गट नवे सेनाभवन बांधू शकेल. त्यांची ताकद फार मोठी आहे. सत्तांतरावेळी सुरतपासून जो प्रवास झाला त्यातून त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. ते प्रतिसेनाभवन बांधतील. मात्र मंदिर बांधलं तरी त्या मंदिरामध्ये देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे”, असं जयंत पाटील म्हणाले होते.

“देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले असते तर…”

यानंतर आज पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. “त्यांनी आता राज्य चांगलं केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्तम प्रशासक त्यांच्यासोबत असताना त्याला दुसऱ्या क्रमांकाची जागा दिली आहे. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले असते, तर वेगळी परिस्थिती असती. भाजपाने असा निर्णय कसा घेतला माहिती नाही”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

‘प्रती शिवसेनाभवना’वर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, “शिंदे गटाची ताकद…” म्हणत जयंत पाटलांनी लगावला टोला

“आता एकनाथ शिंदेंनी लवकरात लवकर कामाला लागावं. देव-धर्म, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पूजा-अर्चा करणं यात जास्त वेळ जात आहे. एकनाथ शिंदेंनी पूजा-अर्चा करण्यासाठी वेगळा मंत्री नेमावा, त्याला पूजा-अर्चा करण्याचं खातं द्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी आता कामाला लागावं अशी आमची विनंती आहे”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

“…तर जनतेसाठी वेळ कधी मिळणार?”

“मुख्यमंत्री कष्ट करतात याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. पण सरकार चालवणं वेगळं आणि एखाद्याला फोन करून पोलीस स्टेशनमधून सोडवणं वेगळं असतं. सरकार चालवण्याची व्यवस्था, वेगवेगळ्या विभागांना गती देणं हे काम त्यांनी करायला हवं. ते करू शकणार नाहीत असं मी म्हणत नाही. पण तिथे लवकर लक्ष द्यायला हवं. होम-हवनात आपला जास्त वेळ जायला लागला, तर जनतेसाठी वेळ कधी मिळणार हा माझा साधा प्रश्न आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

Story img Loader