नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा निषेध केला जात असताना भाजपाकडून मात्र ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या कारवाईवर आणि त्याअनुषंगाने भाजपावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
निलोफर खान यांनी या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांना समन्स न देताच ईडी घेऊन गेल्याचं सांगितलं. तसेच, ते ईडीच्या कार्यालया जाण्यापूर्वीच त्यांचं रिमांड लेटर तयार होतं, असा दावा देखील त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी “निलोफर खान मला मुलीसारखी आहे. फक्त नवाब मलिक तुम्हाला एक्स्पोज करतायत म्हणून घरादाराचे शाप घेणं हे फार चुकीचं आहे”, असं म्हणत निशाणा साधला.
नवाब मलिक कधीच महसूल मंत्री नव्हते!
पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिक यांच्या रिमाड कॉपीवर आक्षेप घेतला. “नवाब मलिक यांच्या रिमांड कॉपीमध्ये ते महसूलमंत्री असताना हा घोटाळा झाल्याचा उल्लेख केला आहे. नवाब मलिक पाच वेळा मंत्री होते. पण ते महसूल मंत्री कधीच नव्हते. महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलं पाहिजे की कशा प्रकारे विरोधकांचा गळा घोटला जातो. जो माणूस त्या पदावरच नव्हता, त्याला त्या पदावर दाखवण्याची चूक एवढी मोठी तपास यंत्रणा करते, हे खेदजनक आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
नवाब मलिकांच्या घरी नेमकं घडलं काय? मुलगी निलोफर यांनी केला खुलासा; म्हणाल्या, “सकाळी ६ वाजता…”
दरम्यान, या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर परखड शब्दांत टीका केली. “असं राजकारण या महाराष्ट्रानं कधी बघितलं नाही. २०१४मध्ये तुमची सत्ता आली. पण ७ वर्षांनंतर तुम्हाला हे सगळं कळतंय? हे किळसवाणं राजकारण आहे”, असं ते म्हणाले. “५५ लाखांच्या व्यवहारासाठी ईडी लागत असेल, तर यापुढे १० रुपये खिशात ठेवताना विचार केला पाहिजे. १० रुपयाच्या गोळ्या घेतानाही विचार करायला पाहिजे की याचीही ईडी चौकशी होऊ शकते”, असा टोला देखील जितेंद्र आव्हाडांनी लगावला.
आव्हाडांनी सांगितला ‘तो’ प्रसंग!
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींविषयीची एक आठवण सांगितली. “जेव्हा गडकरींवर त्यांच्याच पक्षाच्या काही लोकांनी हल्ले केले, तेव्हा टीव्हीवर जाऊन नितीन गडकरींची बाजू घ्यायला मला पवार साहेबांनी सांगितलं. एखादा व्यक्ती चुकीचा नसेल तर त्याच्या बाजूने उभं राहायला हवं. अशी भावना कायम महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये राहिली. द्वेषभावनेने त्याचं कुटुंब, परिवार नष्ट करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनं कधीच पाहिलं नाही”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.