राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची घेऊन जात असल्याचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन भाजपा नेते टीका करताना संजय राऊतांनी त्यांना उत्तर दिलं आहे. दरम्यान यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील टीका करणाऱ्यांवर नाराजी जाहीर केली असून संजय राऊतांचं कौतुक केलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. आदरातिथ्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? अशी विचारणा त्यांनी टीकाकारांना केली आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले –

“संजय राऊत यांनी काल शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही. वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते करतोच. संजय राऊत यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? हे महाराष्ट्रात काय सुरु आहे?,” अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

“संजय राऊतांविरोधात FIR दाखल करा,” ‘त्या’ आक्षेपार्ह टीकेवरुन भाजपा नेते संतापले; पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

पवारांसाठी खुर्ची घेऊन जातानाच्या फोटोवरुन भाजपा नेत्यांची टीका; संजय राऊत म्हणाले “ही सगळी चु****”

महाराष्ट्र कशासाठी ओळखला जातो…आदरातिथ्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. “मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल ज्यांना माहिती आहे त्यातील संजय राऊत आहेत. त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि नमन करतो,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

नेमकं काय झालं होतं –

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून १२ खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेबाहेर निदर्शनं केली जात आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी शरद पवारांसाठी संजय राऊत खुर्ची आणत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संजय राऊतांचं टीकाकारांना उत्तर

संजय राऊत यांना दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरुन भाजपा नेते टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही मी खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतुल्य, वडीलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे”.

“कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

“बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत. त्यांनीच मला हे संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही सांगा त्यांना…ही चु**** बंद करा. अशाने राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील”.

“शरद पवार किंवा त्यांच्या वयाचे, उंचीचे नेते या देशात आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देणं यामुळे त्रास होत असेल तर तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मोठ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना त्रास आहे, शारिरीक वेदना आहेत त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे,” असंही ते म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांनी गांधी कुटुंबीयांच्या भेटींवरुन भाजपा नेते करत असलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी म्हणालो हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत…त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असं सांगेन”.

अतुल भातखळकर यांचीही टीका

“संजय राऊत यांनी माझ्या एका ट्वीटसंदर्भात बोलताना भाजपा आणि खासकरुन भाजपाच्या महिलांविषयी अत्यंत असभ्य, घाणेरडा शब्द वापरला जो मी उच्चारु शकत नाही, कारण मी महाराष्ट्राची संस्कृती पाळणारा मनुष्य आहे. संजय राऊतांनी एकदा नव्हे, दोनदा तो घाणेरडा शब्द भाजपा आणि खासकरुन भाजपाच्या महिलांच्या बाबतीत वापरला. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असून एफआयआर दाखल करावा अशी आमची मागणी आहे. याविरोधात राज्य महिला आणि केंद्रीय महिला आयोगाकडे संजय राऊतांविरोधात तक्रार देणार आहोत,” असं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.