सोमवारपासून (२७ फेब्रुवारी) महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार विधानसभेत भाषण करत असताना एक हलका-फुलका प्रसंग घडला आहे. यावेळी अजित पवारांनी गिरीश महाजनांचा उल्लेख ‘अंकल अंकल’ असा केला आहे.
नेमकं काय घडलं?
विरोधी पक्षनेते अजित पवार महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील अपयशावरून सत्ताधारी पक्षावर टीका करत होते. शिंदे फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन सहा महिने उलटले. तरीही त्यांना राज्यात ठोस कामं करता आली नाहीत, त्यामुळे सुशिक्षित लोकांनी शिंदे फडणवीस सरकारला चपराक लगावली, अशी टीका अजित पवारांनी केली.
हेही वाचा- “ठाकरे हे आडनाव फक्त…”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर
देशात आणि राज्यात सत्ताधारी पक्षाची सत्ता आहे, असं असूनही सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांच्या पक्षातील उमेदवारांवर डोळा ठेवून असतात. सत्ताधारी पक्षात सध्याच्या घडीला ४० ते ५० लोक आमच्यातील आहेत, असंही अजित पवार म्हणाले. अजित पवार भाषण करत असताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी मध्येच अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा- VIDEO: “तुम्ही गद्दार आहात, एका डाकूबरोबर…”, बच्चू कडूंची गाडी आडवून वयोवृद्धाने झापलं
यावेळी अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत गिरीश महाजनांना खोचक टोला लगावला. यावेळी त्यांनी गिरीश महाजनांचा उल्लेख ‘अंकल’ असा केला. गिरीश महाजनांनी भाषणात अडथळा आणताच अजित पवार म्हणाले, “गिरीशजी एक मिनिट, आता माझं भाषण होतं ना… अंकल… अंकल…अंकल काकीला सांगेन आ… मग किती काकी आहेत, ते आपल्याला बघावं लागेल” अशी उपरोधिक टोलेबाजी अजित पवारांनी केली.