भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने आज विश्वासदर्शक ठरवा जिंकला आहे. यानंतर विधानसभेत झालेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हटलं की, “अनेक वर्षे मी देवेंद्रजींना या सभागृहात भाषण करताना पाहिलं आहे. परंतु देवेंद्रजी, नेहमीचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तुमचा जो जोश असायचा, तो मुख्यमंत्री असताना देखील पाहिला आणि विरोधी पक्षनेते असताना देखील पाहिला. तेव्हा सगळेजण शांत बसून तुमचं भाषण ऐकायचे. आज एक वकील या नात्याने तुम्ही हे सर्व कसं योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच एकनाथ शिंदे यांची कारकीर्द कशी देदीप्यमान आहे, हे पण सांगण्याचा प्रयत्न देखील तुम्ही आपल्या भाषणात केला.”

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “यावेळेस विधीमंडळात जे कोणी आमदार निवडून आले आहेत, त्या आमदारांमध्ये सगळ्यात नशिबवान कोण असेल? तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. कारण निवडणुका होऊन अजून अडीच वर्षेच झाली आहेत, अजून अडीच वर्षे बाकी आहेत. पण अडीच वर्षात देवेंद्र मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले, विरोधीपक्षनेते पण झाले, त्यांनी अडीच वर्षात कुठलंच पद ठेवलं नाही. सगळी महत्त्वाची पदं भुषवली.” अजित पवारांच्या या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह सभागृहात एकच हशा पिकला.

अजित पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारली, कुणालाही वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल, पण हे झालं. स्वत: देवेंद्रजींनी भाषणातून सातत्याने एक शिवसैनिक, एक शिवसैनिक असा एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला. असा उल्लेख सतत का करावा लागत आहे. ही वेळ का येते. याचंही आत्मचिंतन झालं पाहिजे. ३० जूनला गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ४ जुलैपर्यंत विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा आदेश राज्यपालांनी दिला होता. त्यानुसार, तुम्ही बहुमताच्या जोरावर हा ठराव जिंकला. आम्ही विरोधी मतदान करत आमची भूमिका व्यक्त केली. लोकशाहीत हे चालतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यात फिरत असताना मी नेहमीच सांगत असतो, सत्ता येते-जाते, ताम्रपट घेऊन कुणीचं येत नाही. पण देवेंद्रजी तुमचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. पण मला हे कळत नव्हतं की, तुम्ही एकनाथ शिंदे यांचं इतकं कौतुक करत होतात, तर मग मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे यांना केवळ रस्तेविकास महामंडळ खातेच का दिलं? त्यांचं कर्तृत्व एवढंच मोठं होतं तर एक मुख्यमंत्री म्हणून एखादं जास्तीचं खातं तुम्ही त्यांच्याकडे का दिलं नाही? असा सवालही अजित पवारांनी यावेळी विचारला. जनतेशी संबंधित नसलेलं खातंच त्यांना का दिलं, याचंही आत्मचिंतन व्हायला पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले.