महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात चौफेर टीका केली आहे. राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचं आजचं भाषण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कानाखाली आवाज काढणारं होतं, असं विधान मिटकरी यांनी केलं आहे.

राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले, “राज ठाकरे यांनी आजच्या भाषणातून शिंदे गटाने लिहिलेली स्क्रीप्ट वाचून दाखवली. मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज केलेलं भाषण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कानाखाली आवाज काढणारं ठरलं. भाजपा आजपर्यंत त्यांच्या (राज ठाकरे) खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांचा उद्देश साध्य करत होती. पण आता भाजपाचा भ्रमनिरास झाला असेल. निश्चितच देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते राज ठाकरेंच्या आजच्या भाषणामुळे अस्वस्थ झाले असतील, असं माझं मत आहे.”

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली अन्…” असे धंदे मी करत नाही म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

“राज ठाकरेंनी राज्यपाल यांनाही खडेबोल सुनावले आहेत. तसेच शिंदे गटाचा एक वाचाळवीर मंत्री अब्दुल सत्तार यांचीही कानउघडणी केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आजच्या भाषणातून बऱ्यापैकी भाजपाच्या तोंडात हाणलं आहे” अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे.

हेही वाचा- “अजूनही काहींची चरबी…” मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंचा पुन्हा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपालांवर राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यांरीवर टीकास्र सोडताना राज ठाकरे म्हणाले, “आपलं वय काय? आणि आपण बोलतो काय? राज्यपाल पदावर बसला आहात, म्हणून मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारावं, तुम्ही तुमचे राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुमच्या राज्यात का नाही व्यापर केला, उद्योग धंदे थाटले. याचं कारण, उद्योग आणि व्यापर करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन कोठे नव्हती,” अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.