शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे नेमकं राज्यात काय घडणार? याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद आणि त्यासोबतच शिवसेना पक्ष प्रमुखपद देखील सोडण्याची तयारी दर्शवल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार कोसळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

“भाजपाकडून कुणीही भूमिका मांडलेली नाही”

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पाठीमागे भाजपा असल्याचा तर्क लावला जात असताना त्यासंदर्भात भाजपाकडून भूमिका मांडण्यात आलेली नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. “भाजपाच्या भूमिकेविषयी त्यांच्यापैकी कुणीही काही भाष्य केलेले नाही. एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन तिथे जाऊन राहिले आहेत याच्यापेक्षा जास्त त्यात काही नाही. पडद्यामागच्या गोष्टींमध्ये जाण्याचं कारण नाही. जाताना कुणी विमानं दिली? येताना कुणी विमानं दिली? ते कुठल्या हॉटेलमध्ये राहिले? हॉटेलची बिलं कुणी दिली? कोण त्यांना पोसतंय? याच्याविषयी आज बोलण्याची गरज नाही”, असं पाटील म्हणाले.

अजित पवारांचं मौन का?

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणाबाबत अद्याप मौन का बाळगलं आहे? असं विचारलं असता जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “अजित पवार हे याविषयी काय बोलणार? मी जे सांगतोय, तेच अजित पवार बोलणार. त्यांनी याविषयी मौन बाळगलेलं नाही तर यासंदर्भात आमच्या सगळ्यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे ही त्यांचीही भूमिका आहे. त्यांच्या सगळ्यांच्या वतीनेच मी बोलतोय”, असं ते म्हणाले.

“अजित पवार यांना कोणत्याही प्रकारे उपमुख्यमंत्रीपदाचा हव्यास नाही. आमचं बहुमत होतं तेव्हा आम्ही सत्तेत राहिलो. जर आमचं बहुमत गेलं, तर आम्ही विरोधीपक्षात बसणारच आहोत”, असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“…तर आजही हे सरकार टिकेल”, एकनाथ शिंदेंच्या बंडावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रवादीच्या आमदारांनी कधी अशी भूमिका घेतली नाही”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी कधीही शिवसेना आमदारांसारखी भूमिका घेतली नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. “आमच्या सरकारने अनेक चांगले उपक्रम केले. आज दुर्दैवाने काही शिवसैनिक सांगत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नको. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करून तिन्ही पक्षांनी एकत्र काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी काहीही अडचण असली, तरी इतर पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. उलट, शरद पवारांनी निर्णय घेतला, तर त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली. माझ्या पक्षाच्या आमदारांनी उघडपणे कधी अशी भूमिका घेतली नाही. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीतही आमचा पक्ष एकसंध राहिला”, असं देखील जयंत पाटील म्हणाले.