Ajit Pawar Minister Babasaheb Patil Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. बाबासाहेब पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहकार मंत्रीपदाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये एका जाहीर सभेमध्ये बोलताना बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जामाफीच्या मुद्द्यावरून केलेलं विधान वादात सापडलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, अशा आशयाचं विधान बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. तसेच, निवडून यायचं असतं म्हणून आम्ही आश्वासनं देत असतो, असंही ते म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले सहकारमंत्री बाबासाहेब पाटील?

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना जळगावमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा मांडताना बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं असून त्यावर आता चहुबाजूंनी टीका होऊ लागली आहे. “लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत काहीही आश्वासनं देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय मागायचंय”, असं बाबासाहेब पाटील म्हणाले.

“एखाद्या गावात निवडणुकीत एक नेता गेला आणि लोकांनी सांगितलं की आम्हाला गावात नदीत आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार. काय मागावं हे तुम्ही ठरवायला हवं. त्यामुळे मागणाऱ्यांनी काय मागायचं ते ठरवायचं. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही आश्वासनं देतो. सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे”, असं बाबासाहेब पाटील म्हणाले. त्यामुळे आता नेतेमंडळी निवडणुकीत देत असलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आधी वादग्रस्त विधान, नंतर सारवासारव

दरम्यान, आपल्या विधानावरून वाद निर्माण होत असल्याचं लक्षात येताच बाबासाहेब पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे. “आज जळगावात एका बँकेच्या उद्घाटनासाठी गेलो असताना ग्रामीण भागात आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासंदर्भात मुद्दा मांडला. अर्बन बँक किंवा पतसंस्थेनंही या शेतकऱ्यांना कर्ज द्यावं. पण अशा काही योजना कर्जमाफीत बसत नाहीत एवढाच माझा म्हणण्याचा उद्देश होता. माझ्या विधानामुळे भावना दुखावल्या असतील, तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो”, असं बाबासाहेब पाटील आपल्या बचावात म्हणाले आहेत.