राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या भाषणावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा पाहायला मिळाली. त्यापाठोपाठ त्यांनी “प्रभू श्रीराम मांसाहारी होते” असं विधान केल्यानंतर त्यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पक्षीय राजकारण चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे.
‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदेत प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये यासंदर्भातले उल्लेख असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. तसेच, १८९१ साली छापल्या गेलेल्या रामायणासंदर्भातल्या पुस्तकातही याचा उल्लेख असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भातली कागदपत्र त्यांनी माध्यमांसमोर ठेवली. यावेळी रोहित पवारांनी केलेल्या टिप्पणीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता जितेंद्र आव्हाडांनी त्यावर केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
आमदार रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. “देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे”, असं रोहित पवार म्हणाले होते.
जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
रोहित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं आहे. “रोहित पवार काय बोलतात याला मी फार महत्त्व देत नाही. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही. अजून लहान आहेत ते. (आमदार म्हणून) पहिलीच टर्म आहे त्यांची”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला आहे. “अबुधाबीत जाऊन बोलणं खूप सोपं आहे”, अशी खोचक टिप्पणीही आव्हाडांनी रोहित पवारांना उद्देशून केली आहे.
शरद पवारांच्या वक्तव्याचा दिला संदर्भ!
“शरद पवारांचं मला नेहमी सांगणं आहे की ‘जितेंद्र सामाजिक बाजू मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही’. याचं उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो, तेव्हा आमचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मला सांगितंल की तू पुरंदरेंची माफी माग. मी घाबरलो होतो. मी शरद पवारांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की ‘तुझा इतिहासाचा अभ्यास आहे. तुला जे योग्य वाटतं ते तू बोल. त्यात पक्षाचं काहीही देणंघेणं नाही’. कारण पक्ष कुणाचीही सामाजिक भूमिका ठरवत नाही”, असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
आव्हाड पक्षात एकटे पडलेत का?
“पक्षात मी एकटा ठरलो असतो, तर एवढी माणसं माझ्यामागे उभी राहिली असती का? मी कोणताही प्रश्न एकटा लढतो. लढाई करताना माझ्याबरोबर किती जण आहेत हे बघून जर लढाईत उतरलो तर मी आयुष्यात कधी लढाई करू शकणार नाही”, असं ते म्हणाले.