शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटानं भाजपाशी हातमिळवणी केली आणि ठाकरे सरकार पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, अजूनही बंडखोर आमदारांच्या पात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राज्यातलं सरकार अल्पकालीन असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडीचंच सरकार पुन्हा येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाविषयी दावा केला जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रीपदाविषयी सूचक विधानं केली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शंभुराज देसाईंच्या वक्तव्यामुळे झाली सुरुवात!

कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाईंच्या वक्तव्यामुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली. पुढची १० ते १५ वर्षं राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर राहील, असं शंभुराज देसाई म्हणाले होते. “या सरकारने लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. आम्ही लोकशाही मार्गानेच चाललो आहोत. लोकशाहीत बहुमताचा आदर व्हायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नाही एवढीच त्यांच्या नेत्यांना खंत आहे. त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत. पुढची अडीच वर्षं नाही, पण किमान १०-१५ वर्षं तरी त्यांना असंच सत्तेविना तळमळत राहावं लागेल”, असं शंभुराज देसाई म्हणाले.

शिंदे गटाला प्रत्युत्तर, भविष्याचं भाकित!

दरम्यान, या मुद्द्यावर राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी सूचक विधान केलं आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असतील, असं ते म्हणाले आहेत.”जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच सरकार असणार आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहेत”, असं लंके माध्यमांशी बोलताना म्हणाले.

अजित पवार की सुप्रिया सुळे?

दरम्यान, राष्ट्रवादीकडून नेमकं कोण मुख्यमंत्री असेल? अशी विचारणा करताच निलेश लंकेंनी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं म्हटलं आहे. “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार परिवारातले सहकारी आहोत. परिवारातील ज्येष्ठाने एखादा निर्णय घेतला, तर तो आम्हाला सर्वांना मान्य असेल”, असं लंके म्हणाले आहेत.

“आता पार दुष्काळाचं वाटोळं…”, शिंदे-फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया!

याशिवाय, “आज सर्वसामान्य जनतेचा रोष आहे. येणाऱ्या काळात उद्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल”, असं दत्ता भरणे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla nilesh lanke said next cm from sharad pawar family ajit pawar or supriya sule pmw
First published on: 26-10-2022 at 14:09 IST