राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले माजी आमदार रमेश कदम यांचा भाजपमध्ये वाजतगाजत प्रवेश करण्याचा बेत अखेर फिसकटला असून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ या सरकारी निवासस्थानी जिल्ह्य़ातील अन्य काही ‘इनकमिंग’बरोबरच तो उरकण्यात येणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा केली. स्वत: कदम यांना हा कार्यक्रम मुंबईपेक्षा त्यांच्या घरच्या मैदानावर चिपळूणमध्ये शक्तिप्रदर्शनासह करण्याची इच्छा होती. त्यानुसार तो होणार असल्याचे दोनवेळा जाहीर करण्यात आले. पण महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे कारण देत प्रत्यक्षात काही झाले नाही. जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून द्यायची असेल तर हा सोपस्कार पूर्ण होणे गरजेचे असल्याची जाणीव कदम यांना असल्यामुळे अखेर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत टळण्याआधी  ‘वर्षां’वर ही औपचारिकता पूर्ण करण्यास ते तयार झाले, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

चिपळूणच्या जनतेने नाकारले असूनही कदम यांना भाजपमध्ये का प्रवेश दिला जात आहे, असे विचारले असता, जनतेने नाकारले हे अर्धसत्य असून कदम यांना अजूनही चिपळूण शहर व तालुक्यात मोठा ‘जनाधार’ असल्याचा दावा माने यांनी केला.

आता खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांनी फोन केला तरी राष्ट्रवादीमध्ये परत जाणार नाही, अशी गर्जना करत कदम यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांच्या पुढाकाराने राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कदम यांची भाजपप्रवेशाबाबत चर्चा होऊन हिरवा कंदील मिळाल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत, यापुढे मान मिळेल त्या ठिकाणी जाईन, असे जाहीर केले.

चिपळूण तालुक्यातील भाजपच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांकडून मात्र कदम यांना अजूनही विरोध असून तशी भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.  पक्षप्रवेशानंतरही कदम यांची भावी वाटचाल सोपी नाही. त्यातच स्वच्छ व कार्यक्षम कारभार आणि रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी त्यांच्या अधिकृत प्रवेशापूर्वीच, काही जणांना पालिका ताब्यात हवी म्हणून निवडणुकीनंतर भाजपची गरज वाटू लागल्याचा टोमणा यापूर्वीच जाहीरपणे बोलताना मारला आहे.

यापूर्वी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी कदम यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून शेकापच्या पाठिंब्यावर रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे त्यांना पुन्हा पक्षात पावन करून घेण्यात आले. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत पक्षाचे जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना दूर ठेवत पक्षश्रेष्ठींनी चिपळूण नगर परिषद निवडणुकीचे सर्वाधिकार कदमांकडे सोपवले. पण या निवडणुकीत २६ पैकी अवघ्या ४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले, तसेच नगराध्यक्षपदही भाजपनेजिंकल्यामुळे सत्तेच्या वर्तुळात वावरण्याची सवय जडलेले कदम अस्वस्थ होते. त्यातूनच अखेर त्यांनी आता भाजपचा पर्याय निवडला आहे. पण केवळ तेवढय़ासाठीच भाजपची वाट धरलेल्या कदमांचा पक्षप्रवेश सुरळितपणे झाला तरी गेली सुमारे चार दशके राजकीय विरोध केलेल्या भाजपमध्ये त्यांचे बस्तान कसे बसणार, याबाबत उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीचे चार नगरसेवक कुठे जाणार

चिपळूण नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेले चार नगरसेवक कदम यांचे कट्टर समर्थक असून पक्ष सोडल्यानंतर कदम यांनी घेतलेल्या मेळाव्यालाही ते उपस्थित होते. २ फेब्रुवारीला कदम यांच्याबरोबर तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे माने यांनी सांगितले. पण राष्ट्रवादीच्या गोटातून याचा इन्कार करण्यात येत आहे. त्यामुळे या चौघा जणांचे मनसुबे त्याच दिवशी उघड होतील, अशी चिन्हे आहेत.