Rohit Pawar on Parth Pawar Case: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील महार वतनाच्या जमीन खरेदी प्रकरणात विरोधकांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर एकच खळबळ उडाली. पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपी कंपनीने खरेदी व्यवहार केल्याचे सांगितले गेले. त्यानंतर पार्थ पवार यांच्या कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह काही सरकारी अधिकारी आणि इतरांवर गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे, आजोबा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र नेहमीच प्रत्येक विषयांवर व्यक्त होणारे रोहित पवार मौन बाळगून होते. अखेर आज त्यांनी आपले मौन सोडले असून प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी मौन बाळगल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही खोचक प्रतिक्रिया देत रोहित पवारांना डिवचले होते. ऐरवी नको त्या विषयावर ज्ञान पाजळणारे रोहित पवार आता कुठे आहेत? असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला होता. माझ्या पोपटाची आता वाचा बसली का? असा चिमटाही त्यांनी काढला. यावरही रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

तीन दिवसांपासून शांत का होते?

संजय शिरसाट यांच्या टीकेवर बोलत असताना रोहित पवार म्हणाले, “तुम्ही तुमच्यापुरते बोला. तुम्ही ५००० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही तोंड उघडत नाहीत. पण नको त्या विषयात तोंड उघडत असाल तर माध्यमांसमोर आपण समोरसमोर येऊन चर्चा करू.”

“गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठिक नाही. त्यामुळे मी सोशल मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहे. माझ्या कार्यालयाने सोशल मीडियावर भूमिाक मांडण्यापेक्षा मी स्वतः त्यावर विचार करून भूमिका मांडत असतो. पण माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही”, असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले.

पार्थ पवार यांच्या प्रकरणावर म्हणाले….

जमीन खरेदी प्रकणावर बोलत असताना रोहित पवार म्हणाले, सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो कुणीही जर बेकायदेशीर काम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. खरे आणि खोटे काय? हेही जनतेसमोर आले पाहिजे. पण या व्यवहारामागची साखळी समोर आली पाहिजे. कारण अधिकारी काही विशिष्ट लोकांचीच कामे करत असतात, हे का होते? याचीही माहिती समोर आली पाहिजे.

अजित पवारांच्या कुबड्यांची गरज संपली का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण कसे बाहेर आले? याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागेच कुबड्यांची गरज नाही, हे स्पष्ट केले होते. कुबड्यांची ताकद आता कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काही लोकांची अपेक्षा होती की, आदराने कुबड्यांना टांगले जाईल. पण इथे कुबड्यांना तोडून चुलीत घालण्याचा प्रयत्न होत आहे.