राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्याचे बोलले जाते. यावर अखेर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करून ते सांगतील तेव्हा मी दिल्लीत जाऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहे”, असे खडसे म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी संदर्भात आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांना भाजपाने खोट्या फाईलची भिती दाखवली असेल, असा टोला लगावला. तसेच भाजपा खोट्या फाईल पुढे आणून भिती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार काय म्हणाले?

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेले नऊ-दहा मोठे नेते, ज्यांना आता पदे मिळालेली आहेत. त्यांनाही ब्लॅकमेल करण्यात आले होते. त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या. त्यामुळे जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपा बरा, या अनुषंगाने ते भाजपाबरोबर गेले. आता एकनाथ खडसे यांच्याबाबतही खोट्या पद्धतीचे ब्लॅकमेल केले असावे, खोट्या फाईल पुढे आणून जसे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले, तसे जर एकनाथ खडसे यांना तुरुंगामध्ये टाकले असते तर त्यांच्या आरोग्याची परिस्थिती खालावली असती. त्या काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा”, असे रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा : मोठी बातमी! एकनाथ खडसे स्वगृही परतणार, भाजपा प्रवेशाबाबत दिली माहिती; म्हणाले…

एकनाथ खडसेंची दिल्लीवारी

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यातच त्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटोही समोर आले होते. त्यामुळे एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपात सामील होतील, अशा चर्चांनी जोर धरला होता. यावर अखेर एकनाथ खडसे यांनीच मौन सोडत ‘मी लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहे’, असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहिणी खडसे यांच्या पोस्टची चर्चा

एकनाथ खडसे यांच्या भाजपात जाण्याची चर्चा सुरु असतानाच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबरच राहणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये रोहिणी खडसे या म्हणाल्या, “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी याच पक्षात असून भविष्यातदेखील याच पक्षात राहणार आहे”, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.