तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुकयातील पाण्यापासून वंचित असलेल्या १९ गावांसाठी टेंभूच्या विस्तारित योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र रोहित पाटील हेही उपोषणास बसले आहेत. दरम्यान, रविवारीच या योजनेला मान्यता दिल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे सुपुर्द केले.
हेही वाचा >>> भंडार्ली कचराभूमीचा वाद पेटला; मनसे आमदारासह ग्रामस्थांनी घेतली आयुक्तांची भेट
तासगाव तालुक्यातील सावळज, सिध्देवाडी, दहीवडी, जरंडी, यमगरवाडी, वायफळे, बिरणवाडी, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी, घाटनांद्रे,रायवाडी, केरेवाडी आणि शेळकेवाडी या १९ गावांसाठी टेंभू योजनेच्या सुधारित प्रस्तावात समावेश करावा अशी मागणी आहे. या मागणीसाठी वेळोवेळी निवेदने देउनही राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता रखडल्याचा आरोप आमदार श्रीमती पाटील यांनी केला.
हेही वाचा >>> आता राजकारणात उतरणार? मनोज जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करत म्हणाले…
दरम्यान, या वंचित गावासाठी पाणी देण्यासाठी टेंभूच्या विस्तारित योजनेसाठी आठ टीएमसी पाणी उपलब्धध् करून देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून तसे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना रविवारी दिले. मात्र, जोपर्यंत या कामाला सुरूवात कधी केली जाणार याचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे आमदार श्रीमती पाटील यांनी सांगितले. या उपोषणाला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजा पाटील आदींनी उपोषणस्थळी भेट देउन पाठिंबा दर्शवला. या उपोषणासाठी तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातून अनेक कार्यकर्ते आले होते.