कचराभुमी बंद करण्यासाठी पालिकेची नवी मुदत
ठाणे- ठाणे महापालिकेने हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कचरा प्रकल्पास ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होऊ लागला असून हा प्रकल्प बंद करण्यासाठी मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी रोखून धरल्याने कचराभुमीचा वाद पेटला आहे. दरम्यान, आमदार पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मुख्यालयात सोमवारी भेट घेऊन कचराभुमी बंद करण्याचा आग्रह धरला. अखेर २५ ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले. परंतु यापुर्वी दिलेल्या मुदतींचे पालन झालेले नसून नव्या मुदतीचे पालन होणार का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा >>> ठाणे : मनसेचे टोल दरवाढविरोधात ‘गांधीगीरी’ आंदोलन
ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डायघर येथे प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. हे काम पुर्ण होईपर्यंत पालिका हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरता प्रकल्प प्रशासनाने उभारला आहे. वर्षभरासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता. परंतु दिड वर्षे झाले तरी डायघर प्रकल्पाचे काम पुर्ण झाले नसल्यामुळे भंडार्ली कचरा प्रकल्प सुरुच आहे. या प्रकल्पात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. यातूनच या प्रकल्पास विरोध होत आहे. हा प्रकल्प बंद करण्यासाठी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी पुन्हा आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा घेऊन येणारी वाहने रोखून धरण्यात आली होती.
हेही वाचा >>> मराठी लोकांबद्दल टिप्पणी, कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांचा चोप
याबाबत माहिती मिळताच ठाणे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यासंदर्भात आयुक्तांसोबत एक बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार सोमवारी दुपारी पालिका मुख्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात झालेल्या बैठकीला मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्प बंद करण्यासाठी प्रशासनाला भेडसावत असलेल्या समस्या आणि त्यावर कशाप्रकारे मात करण्याचे काम सुरू आहे, याची माहिती आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिली. येत्या २५ ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद केला जाणार असून याठिकाणी एकही कचरागाडी जणार नाही, असे लेखी आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. या आश्वासनानंतरही कचरा प्रकल्प बंद झाला नाहीतर प्रकल्पाच्या ठिकाणी एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
नवी मुदत
भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कचरा प्रकल्पास ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे. १५ सप्टेंबर रोजी हा प्रकल्प बंद केला जाईल असे आश्वासन महापालिकेने दिले होते. त्यानंतर ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आली. त्यानंतर आता २५ ऑक्टोबरची नवी मुदत देण्यात आली आहे. यामुळे यापुर्वी दिलेल्या मुदतींचे पालन झालेले नसून नव्या मुदतीचे पालन होणार का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
डायघर येथील कचरा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध
भंडार्ली कचरा प्रकल्प बंद होत असताना दुसरीकडे डायघर येथील कचरा प्रकल्पास स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात आमदार पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, महापालिकेने या प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकाचे निरासन केले तर काही अडचण राहणार नाही. परंतु स्थानिकांचे समाधान झाले नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही त्यांच्या बाजूने उभे राहावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.