राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी रोखठोक वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. काल (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा अर्थसंकल्प मांडला. प्राप्तीकरात सात लाखांच्या उत्पन्नापर्यंत सूट दिल्यामुळे मध्यमवर्गीयांतून अर्थसंकल्पाबाबत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कर कमी जास्त केल्यामुळे मोबाईल, इलेक्ट्रिक कार, सायकल या वस्तू स्वस्त होणार आहेत, तर सिगारेट, सोनं-चांदी, प्लॅटिनम महाग होणार आहे. यावर अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले. पण यावेळी युजर्सनी त्यांच्या ट्विटमधील एक गोष्ट पकडून त्यांना वेगळाच सल्ला दिला आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बजेट चार ओळीत सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिले, “बजेट चार ओळीत, ज्या वस्तू घेतल्या आहेत…, त्या स्वस्त होणार. ज्या घ्यायचं ठरवलं आहे त्या महाग होणार” मात्र त्यांच्या ट्विटवर काही जणांनी वेगळाच आक्षेप घेतला आहे.
बिईंग वन या फेक अकाऊंटने लिहिले की, व्हॉट्सअपवरुन कॉपी पेस्ट करुन आता बजेट समजवणार का?
तर शंतनू नावाच्या युजरने, “दुसऱ्यांची कॉपी करून पोस्ट टाकता. स्वतःचे काही विचार आहे की नाही तुमचे” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तर इतर युजरनी पातळी सोडून अमोल मिटकरी यांना ट्रोल केले आहे. आपल्या ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या मिटकरींना ट्रोलर्स नेहमीच ट्रोल करत असतात.
मात्र हे गमतीशीर ट्विट टाकण्याआधी मिटकरी यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करणारे गंभीर ट्विट देखील केले होते. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांनी लिहिले, “केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारा ठरला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतमालाला दीडपट भावाचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. या अर्थसंकल्पात मोदीजींनी नेहमीप्रमाणे मौन पाडून शेतकऱ्यांच्या जखमावर मिठ चोळले आहे.”
अर्थसंकल्पामुळे नक्की काय स्वस्त-महाग होणार?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल देशात तयार होणारे मोबाईल स्वस्त होतील, अशी घोषणा केली होती. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीवरील आयात शुल्क कमी केले जाईल, त्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनेही स्वस्त होणार असल्याचे सांगितले.
काय स्वस्त होणार?
मोबाईल फोन
टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग
इलेक्ट्रिक वाहने
इलेक्ट्रिक कारची बॅटरी
हिऱ्याचे दागिने
खेळणी
कॅमेरा लेन्स
कपडे
बायोगॅसशी संबंधित वस्तू
लिथियम सेल्स
सायकल
काय महाग होणार?
सिगरेट
एक्स-रे मशीन
विदेशी किचन चिमणी
शराब
छत्री
सोने
आयात केलेले चांदीचे दागिने
चांदीची भांडी
प्लॅटिनम
हिरा
कम्पाऊंडेड रबर