Sunetra Pawar Clarification on RSS Meeting: राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांचा एक फोटो आज दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळाला. या फोटोमध्ये सुनेत्रा पवार या आरएसएसच्या एका बैठकीत उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी या बैठकीत उपस्थिती लावल्यामुळे त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. खुद्द त्यांचे पुतणे रोहित पवार यांनीदेखील या उपस्थितीवर आक्षेप घेत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खुद्द सुनेत्रा पवार यांनीच या सगळ्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमका काय आहे वाद?
भारतीय जनता पक्षाच्या मंडी मतदारसंघातील खासदार कंगणा रणौत यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांच्या घरी आयोजित एका बैठकीबाबत माहिती देण्यात आली होती. “आज माझ्या घरी राष्ट्र सेविका समिती महिला शाखेचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सनातन मूल्य, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय चेतना आणखी प्रखर बनवुयात. आम्हा सर्वांचा संकल्प आहे की मानव सेवा आणि राष्ट्र निर्माण व सनातन संस्कृतीचे रक्षण यासाठी सतत कार्यरत राहू”, असं त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. याशिवाय काही फोटोदेखील पोस्ट केले होते.
त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये बैठकीच्या ठिकाणी सुनेत्रा पवार उभं राहून काहीतरी सांगत असल्याचा एक फोटोदेखील आहे. या फोटोवरूनच सारा वाद सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी मानणाऱ्या सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या एका बैठकीला उपस्थिती लावतात अशा आशयाचे आक्षेप त्यावर घेण्यात आले.
त्यांच्यावर दबाव असावा – रोहित पवार
त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचा दबाव सुनेत्रा पवारांवर असावा, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. “सत्तेत ते गेलेत, त्याची कारणं वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काही त्या लोकांनी स्वीकारले नसतील. पण कुठेतरी यांच्यावर प्रेशर असेल की एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या. म्हणजे हे आरएसएसचा विचार स्वीकारत असल्याचा संदेश जातो. एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एकाबाजूला चव्हाण साहेबांचे, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी माध्यमांना दिली.
काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
दरम्यान, आपल्या उपस्थितीवर वाद निर्माण झाल्याचं पाहताच सुनेत्रा पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यासाठी त्यांनी एक्सवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.
“एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेची खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दांत माझी भूमिका मांडली”, असं सुनेत्रा पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील”, असंही त्यांनी नमूद केलं आहे.