शेतकर्‍यांनी मागितल्या चारा छावण्या आणि सरकारने दिला डान्स व लावण्या अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील डान्सबार सुरु करण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला. आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा जळगावमध्ये पोहोचली असून शुक्रवारी या सभेत छगन भुजबळ यांनी भाजपावर टीका केली. ही लढाई संविधान विरुद्ध मोदी अशी आहे.संविधानाने सव्वाशे कोटी लोकांना एका धाग्यात बांधून ठेवले आहे ते संविधान आपल्याला वाचवायचे आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. यांना राममंदिर बनवायचं नाहीय, यांना सरकार बनवायचं आहे. पुन्हा एकदा जातीजातीमध्ये भांडणं लावून तुम्ही मुर्ख आहात हे दाखवून दयायचे असे काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सव्वाशे कोटी लोकांनी शिरोदत्त मानले आहे. त्यामुळे सांगून ठेवतो राज्यातील कुठल्याही महिलेला किंवा कुटुंबांना त्रास दिला आणि त्यांना न्याय दिला नाही तर गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.एवढं सुंदर महाराष्ट्र सदन बांधले परंतु बनवणारा मात्र जेलमध्ये गेला. १०० कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आणि मग मला साडेआठशे कोटी कसे मिळतील असा सवाल करतानाच या गोष्टीने छगन भुजबळ थांबणार नाही, घाबरणार नाही म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. अरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर पंगा झाला… तुम्ही तर काय आहात असेही भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nirdhar parivartan yatra jalgaon chhagan bhujbal hit out at bjp over dancebar sc verdict
First published on: 19-01-2019 at 15:38 IST