येत्या ३१ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांचा निकाल देणार आहेत. तोपर्यंत राष्ट्रवादीतील आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी घेतली जाणार आहे. नुकताच राहुल नार्वेकरांनी शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला असून तो ठाकरे गटाच्या विरोधात गेल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या निकालावर तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना शरद पवार गटानं अजित पवारांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. यासंदर्भात अजित पवारांच्या काही जुन्या व्हिडीओंची एक क्लिप शरद पवार गटानं एक्सवर (ट्विटर) शेअर केली आहे.

“दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द!”

या व्हिडीओसह शरद पवार गटानं एक पोस्ट शेअर केली असून त्यातून अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं आहे. “दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द! आणि आज हे माजी टीकाकार मूग गिळून गप्प झालेत. तेही का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही, तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात. आणि लक्षातही ठेवायचे असतात”, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

शरद पवार गटाकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवारांच्या जुन्या भाषणातील, पत्रकारांशी साधलेल्या संवादातील काही क्लिप्स एकत्र करण्यात आल्या आहेत. एका क्लिपमध्ये अजित पवार “आधीपासूनच शब्दाचा पक्का म्हणून माझी ओळख आहे. कुणाला दिलेला शब्द फिरवणं, कुणाला फसवणं, कुणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबात जमत नाही”, असं म्हणताना दिसत आहेत. तसेच, “या मोदीला हटवा”, असंही एका भाषणात ते म्हणताना दिसत आहेत.

एक क्लिप अजित पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत काय भूमिका मांडली त्याविषयी असून या पदावर आपण कामच करू शकत नाही, तो प्रश्नच येत नाही, असं म्हणताना दिसत आहेत. त्याच्याच पुढच्या क्लिपमध्ये सुनील तटकरे अजित पवारांचा उल्लेख “आपले राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री”, असा करताना दिसत आहेत.

Video: “तिळगुळ घ्या, गोड बोला पण या मोदीला हटवा”, अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर तुफान चर्चा!

“ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला”

सगळ्यात शेवटच्या क्लिपमध्ये अजित पवारांनी शिवसेनेतील पक्षफुटीनंतर शिंदे गटावर टीका करताना केलेला उल्लेख दिसत आहे. “अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, पक्ष वाढवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं”, असं ते म्हणताना दिसत आहेत.