राष्ट्रवादी काँग्रेसने ‘पीआरएस’ (PRS) संस्थेच्या अहवालाचा आधार घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वोत्तम कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. तसेच सुप्रिया सुळेंवर कौतुकाचा वर्षाव केलाय. ही आकडेवारी देताना सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न विचारण्याची सरासरी राज्यातील खासदार आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक असल्याचं राष्ट्रवादीने सांगितलं. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत ट्विट करण्यात आलेत. याशिवाय स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत फेसबूक पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट करत म्हटलं, “लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. लोकसभेत होणाऱ्या विविध चर्चांमध्ये तब्बल १५९ वेळा सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. तसेच आतापर्यंत ३८३ प्रश्न उपस्थित केले. प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांची राज्याची सरासरी २०९ असून राष्ट्रीय सरासरी १०८ आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी १७ व्या लोकसभेत ७ खासगी विधेयके मांडली आहेत.”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीची ५० हून अधिक वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांच्या संसदीय कारकिर्दीचा वसा पुढे नेण्याचे काम सुप्रिया सुळे नेटाने करत असल्याचे पीएसआर संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे,” असंही राष्ट्रवादीने सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या १७ व्या लोकसभा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली. संसदेच्या रेकॉर्ड्समधील नोंदीनुसार ‘पीआरएस’ या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहीर केली आहे. यामध्ये अधिवेशनातील उपस्थितीसह प्रश्नोत्तरे, विविध चर्चांमधील सहभाग, खासगी विधेयके आदींचा प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे. ही आकडेवारी आपल्या माहितीसाठी शेअर करत आहे. आपण सर्वांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हे शक्य झाले आहे.”

“बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सहयोगी पक्ष व कार्यकर्त्यांनी मला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आपल्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. यातूनच मला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते. यापुढेही संसदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन याची ग्वाही देते,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp praise mp supriya sule for performance in parliament winter session refer statistics of prs pbs
First published on: 03-01-2022 at 19:33 IST