scorecardresearch

मंडणगड नगर पंचायतीमध्ये अपक्षांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

या घडामोडींमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम गटाला  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धोबीपछाड दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Congress, NCP, Sonpeth, Parbhani,

रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड नगर पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे स्पष्ट बहुमत झाले आहे.

या घडामोडींमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम गटाला  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धोबीपछाड दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मंडणगड व दापोली नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात रामदास कदम-आमदार योगेश कदम या पिता-पुत्रांचा गट, अशी थेट लढत झाली. शिवसेनेच्या बंडखोरांनी या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी ‘शिवसेवा शहर विकास आघाडी’ स्थापन करत महाविकास आघाडीला जोरदार टक्कर दिली.  दापोली नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले, पण मंडणगडमध्ये यश आले नाही. येथे राष्ट्रवादीचे ७ तर शिवसेवा शहर विकास आघाडीचे ७, तर ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले. यामुळे सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या.

त्यामुळे अपक्षांना स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरु झाला होता. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना या प्रयत्नांमध्ये यश येत तीनपैकी दोन अपक्ष नगरसेवकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ व २ अपक्ष असे मिळून राष्ट्रवादीच्या  ९ नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात या ९ सदस्यांसह येऊन स्वतंत्र गट स्थापन केल्याचे पत्र दिले आहे. अपक्ष नगरसेविका सोनल सचिन बेर्डे आणि रेश्मा हरेश मर्चंडे या दोघींचा त्यामध्ये समावेश आहे.

 माजी आमदार संजय कदम व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास ठेवत आपण पाठिंबा दिला असल्याचे या अपक्ष सदस्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp rule in mandangad nagar panchayat with the support of independents akp

ताज्या बातम्या