राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. यादरम्यान शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता शरद पवारांनी आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. यादरम्यान मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं.

राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचा संयुक्त उमेदवार ; शरद पवार-खरगे चर्चा

राज्यात काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा पाठिंबा राहील असं जाहीर केल्यानंतर हे विधान समोर आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे”. दुसरीकडे आपचे संजय सिंग यांनीही शरद पवारांना रविवारी फोन केला होता.

आघाडीच्या पराभवाबद्दल शरद पवारांची नाराजी ; मंत्र्यांची कानउघडणी

राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार विरोधकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहेत. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दर्शवली आहे.

दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. या बैठकीत निवडणुकीसाठीच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील या निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.

‘…तर शरद पवार यांच्या नावाला आमचा पाठिंबा,’ राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे भाष्य

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया २१ जुलै रोजी पार पडेल.

राष्ट्रपती निवडणुकीची राजकीय गणिते

सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधक या दोघांनीही त्यांच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केले नाही. त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. आकड्यांच्या समीकरणात ४८% मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असणार आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदाय त्यांच्या त्यांच्या राज्यात विधानभवनात मतदान करतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar says i am not in race of presidential election sgy
First published on: 14-06-2022 at 09:31 IST