राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक नेते राष्ट्रवादीपेक्षा भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा विचार केला गेला पाहिजे असं मत व्यक्त करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितल्यानुसार, “शरद पवारांच्या वक्तव्याने आपल्याला धक्का बसला आहे. शिवसेनेने शरद पवारांसोबत जाण्याआधी दहा वेळा विचार केला पाहिजे”. “हे कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे? ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसपासून दूर राहिलं पाहिजे तसंच भाजपासोबत हातमिळवणी केली पाहिजे,” असं मत शिवसेना नेते व्यक्त करत आहेत.

गेल्या आठवड्यात सामायिक कार्यक्रम ठरवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्रित बैठक वांद्रे येथे पार पडली. बैठकीनंतर एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सामायिक कार्यक्रम ठरला असून त्यावर अंतिम निर्णय आपल्या पक्षाचे प्रमुख घेतील असं सांगितलं होतं. त्यामुळे शरद पवार सोमवारी सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर सत्तास्थापनेवर बोलतील अशी अपेक्षा होती. पण शरद पवार यांनी सामायिक कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसल्याचं सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

दक्षिण मुंबईतील एका कट्टर शिवसैनिकाने, पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली नाही पाहिजे असं मत व्यक्त केलं असून भाजपा नको असेल तर एकट्यानेच वाटचाल करावी असं म्हटलं आहे. “भाजपा नको असेल तर शिवसेनेने एकट्याने आपल्या अजेंड्याला धक्का न लावता वाटचाल केली पाहिजे. समान विचारसरणी असणाऱ्या पक्षासोबत जाण्याची इच्छा नसेल तर एकट्यानेच लढावं,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर पडद्यामागील सुरु असलेल्या राजकारणावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. संजय राऊत यांनी सोमवारी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण राजकारण नाही तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पवारांशी चर्चा केल्याचं सांगितलं. तसंच शिवसेनेच्या नेतृत्त्वातील सरकार स्थापन करु असा आत्मविश्वास व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar shivsena uddhav thackeray bjp congress maharashtra political crisis sgy
First published on: 19-11-2019 at 13:57 IST