मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. यामध्ये जातीपातीच्या राजकारणावरून राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. मात्र, यासोबतच भूमिका बदलण्यावरून देखील राज ठाकरेंनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. सोनिया गांधींविषयीच्या आरोपांवर शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरेंनी ठाण्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी घडलेल्या घटनांची आठवण करून देत टीका केली. “शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. बरं शरद पवारांनी सांगावं की राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो? राष्ट्रवादी काँग्रेसनं हे बोलावं? परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार १९९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली. शरद पवारांनी आत्तापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणलीये”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

…म्हणून पुन्हा एकत्र आलो, शरद पवारांचं स्पष्टीकरण!

राज ठाकरेंच्या याच टीकेवर शरद पवारांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. “सोनिया गांधींनी देशाचं पंतप्रधान व्हावं की नाही, या मुद्द्यावर माझं मत जाहीर होतं. पण मला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की सोनिया गांधींनी स्वत:हून पंतप्रधानपदासाठी इच्छुक नसल्याचं, त्यासाठी उमेदवार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हा प्रश्न संपला. सोनिया गांधींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आमचा वादाचा विषयच राहिला नाही. त्यानंतर एकत्र येऊन काहीतरी करावं, अशी सूचना अन्य सहकाऱ्यांनी केल्यानंतर आम्ही एकत्र आलो, आजही आहोत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना एकच आहेत. त्यामुळे ही भूमिका मी काही ऐन वेळी बदललेली नाही”, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : “वर्ष-सहा महिन्यात एखादं वाक्य बोलून…”, शरद पवारांचा राज ठाकरेंवर खोचक टोला!

दरम्यान, राज ठाकरेंना वाचनावरून देखील शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे. “हे जे काही सगळं त्या काळात घडलं, याचं सविस्तर वाचन केलं असतं, तर असे उद्गार काढले गेले नसते”, असं पवार म्हणाले.

“मतदारांनी त्यांची योग्य किंमत केली आहे”

“त्यांनी स्वता:च्या पक्षाबाबत काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते म्हणतात मनसे हा पक्ष संपवणारा पक्ष आहे. याची नोंद महाराष्ट्राच्या मतदारांनी घेतली आणि त्यांच्या पक्षाला विधिमंडळात एकही जागा दिलेली नाही. त्यातून मतदारांनी त्यांची योग्य किंमत केली आहे”, असं देखील पवार म्हणाले.