शिवसेनेतून मोठा झालेला हाच लबाड कोल्हा, आता…; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर पलटवार

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्यावरून अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यात राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे.

Shivajirao Adhalrao Patil, Amol Kolhe, shivsena, ncp, pune, mahavikas aghadi
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्यावरून अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यात राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष उफाळून आला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ठिणगी पडली आहे. त्यानंतर आढळराव पाटील यांच्यावर टीका करताना खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद असल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत’, असं कोल्हे म्हणाले होते. खासदार कोल्हे यांनी केलेल्या टीकेनंतर आढळराव पाटील यांनी पलटवार केला.

खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनीही खासदार कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “बायपास रस्त्याचं काम मी खासदार असताना सुरु झालं होतं. या कार्यक्रमाला मला डावलण्यात आलं. माझा, मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिथे नव्हता. मला या कार्यक्रमात बोलवावं एवढीच माझी अपेक्षा होती. कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावं. स्थानिक विषयांत पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येतो कुठे?,” असं आढळराव पाटील म्हणाले.

हेही वाचा- आढळराव-अमोल कोल्हे संघर्ष पेटला; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोल्हेची टीका

“थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय? अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहेत. मी म्हातारा असलो, तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राट नाही”, अशा शब्दात आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा- शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर -अमोल कोल्हे

संघर्षाची ठिणगी का पडली?

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्यावरून अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यात राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रस्त्याचं उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुलाही केला. ‘हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत’, असा दावा आढळराव पाटील यांनी केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp shiv sena amol kolhe statement about uddhav thackeray shivaji adhalrao patil reaction bmh