संत तुकाराम महाराजांविषयी अवमानकारक विधान केलेले मध्य प्रदेशातील छतरपूरच्या बागेश्वर धामाचे धीरेंद्र शास्त्री महाराजांची नव्या दिल्लीत भेट घेऊन त्यांना सोलापूर जिल्ह्यात भेटीचे आमंत्रण दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा पक्षाचे  जिल्हा कार्याध्यक्ष  उमेश पाटील हे अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, पाटील यांनी यासंदर्भात सारवासारव करताना धीरेंद्र शास्त्री महाराजांची योगायोगाने भेट झाली असताना भारतीय संस्कृतीचा भाग म्हणून त्यांना आपण अभिवादन करून सोलापूर भेटीचे आमंत्रण दिल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा >>> ठाकरे गटातील नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स? रामदास कदमांचा मोठं विधान, म्हणाले…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचा दावा करणारे उमेश पाटील हे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते असून जिल्हा कार्याध्यक्षही आहेत. त्यांनी समाज माध्यमावर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या बरोबर दिल्लीत झालेल्या भेटीची चित्रफित आणि छबी प्रसारीत केल्या आहेत. यात त्यांनी धीरेंद्र शास्त्री महाराजांना सोलापूर जिल्ह्याच्या भेटीचे आमंत्रण दिल्याची माहिती नमूद केली आहे. परंतु या मुद्यावर ते वादाच्या भोव-यात सापडले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या विषयी आक्षेपार्ह अवमानकारक विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना भेटून अभिवादन करून आणि सोलापूर भेटीचे आमंत्रण दिल्याची माहिती चित्रफित व छबींसह समाज माध्यमातून स्वतः प्रसारीत केल्यामुळे उमेश पाटील यांच्यावर नेटक-यांनी टीकेची झोड उठविली आहे. धीरेंद्र शास्त्रींना सोलापूरपेक्षा बारामतीच्या गोविंद बागेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात घेऊन जावे, असा खोचक सल्ला नेटक-यांनी उमेश पाटील यांना दिला आहे.

हेही वाचा >>> “योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मीही होतो” भरसभेतून उदय सामंतांची कबुली

संत तुकारामांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना अभिवादन करणे आणि सोलापूर भेटीचे आमंत्रण देणे हा महाराष्ट्रातील संतांचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटक-याने व्यक्त केली. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार व त्यांचा पक्ष पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारा आहे.  त्यांचा पुरोगामी विचारांचा वारसा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रूजला नाही,  यावर उमेश पाटील यांच्या कृतीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर धीरेंद्र शास्त्रींची भेट योगायोगाने झाली असेल तर मग हात जोडून अभिवादन करतानाच्या छबी काढून समाज माध्यमातून प्रसारीत करण्याची गरज नव्हती. उलट, धीरेंद्र शास्त्रींना संत तुकाराम महाराजांचा अपमान का केला म्हणून त्यांना तेथेच जाब विचारायला हवा होता, अशीही प्रतिक्रिया नेटक-यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात उमेश पाटील यांनी सरवा सारव केली असून आपण राष्ट्रवादीच्या विचारांशी ठाम आहोत, केवळ संस्कृती म्हणून आपण धीरेंद्र शास्त्रींना अभिवादन केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. धीरेंद्र शास्त्रींशी एका मिनिटाचा संवाद झाला. त्यावेळी त्यांनी आपणांस बागेश्वर धामात येण्यास सांगितले. तेव्हा आपणही त्यांना सोलापूर भेटीचे आमंत्रण दिले. ही भेट  औपचारिक आणि योगायोगाने झाली. परंतु यावरून गैरसमज निर्माण केला जात आहे. धीरेंद्र शास्त्री महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या विषायी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थन आपण करीत नाही. आपल्या पक्षाच्या  आणि नेत्यांच्या विचारांना ठेच लागेल, असे कृती आपण करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.