येत्या पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. नवनविर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार असून त्यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे सकाळीच विधानभवनात दाखल झाल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांनी ऐक्य दाखवलं याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं.

“गेल्या काही दिवसांपासून आमदारांच्या मनातही संघर्ष सुरु होता. त्यांची मनस्थिती मी समजू शकते. मी आमदारांचं स्वागत करण्यासाठी आले आहे. आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हानं आहेत. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. पुढील पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र निर्माण करु. त्यासाठी जे लागतील ते कष्ट करु,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राच्या जनतेची सेवा ही एकच गोष्ट आमच्या मनात आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विरोधातील आवाज दाबण्याचं काम आम्ही कधी करणार नाही असा टोला त्यांनी लगावला. तसंच पवार कुटुंबात कोणतेही मतभेद नसून सगळं काही ठीक आहे असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

महाविकास आघाडीने मंगळवारी राज्यपालांकडे १६६ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. राज्यपालांनी आघाडीला ३ डिसेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यास सांगितले आहे.