राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा विरोधकांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ताशेरे ओढताना अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात असा टोला लगावला होता. निलेश राणेंच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
निलेश राणेंनी काय म्हटलं आहे?
“अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल. पण बरं झालं अजित पवार यात पडले नाहीत, कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार,” असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
विद्या चव्हाण यांचं उत्तर –
निलेश राणे यांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. “निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत,” असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.
“निलेश राणे आपल्या बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांना स्वतःची अक्कल नाही. भाजपामध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतलं आहे त्यात नारायण राणेंची दोन मुलं अग्रेसर आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा विजय
राज्यसभा निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसतानाही अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या साहाय्याने भाजपने तीन जागा जिंकल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची कसोटी लागणार आहे. अपक्षांची खात्री देता येत नसल्याने आणि गुप्त मतदान पद्धतीमुळे स्वपक्षीय आमदारांच्या मतांची फाटाफूट होऊ नये याची खबरदारी महाविकास आघाडीला घ्यावी लागणार आहे. त्यातच विधान परिषदेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळाच आला आहे. राज्यसभेपाठापोठ विधान परिषदेतही पराभव झाल्यास महाविकास आघाडी सरकारचे स्थैर्यच धोक्यात येऊ शकते.
राज्यसभेच्या चारही जागा जिंकण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला होता. आघाडीने आमदारांची जमवाजमव केली होती. त्यानुसार आघाडीच्या तंबूत अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचे आमदार डेरेदाखल झाले होते; पण त्यातील काही जणांनी भाजपला मतदान केल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला.
भाजपाचे १०६ आमदार असून, सात आमदारांचा त्याला पाठिंबा आहे. भाजपाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाल्याने अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांची १० मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीबरोबर असलेल्या काही अपक्ष आमदारांनी दगा दिल्याचा आरोप शिवसेनेने केला. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी न मिळाल्याने महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली होती. तरीही एमआयएमच्या पाठिंब्यामुळे ती कसर भरून निघाली होती. मात्र महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची १६१ मते मिळाली. एवढी मते मिळूनही योग्य नियोजनाअभावी महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून येऊ शकली नाही. अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचे एकूण २९ आमदार आहेत. त्यापैकी १७ मते भाजपला मिळाली आहेत.