Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अशी बातमी दोन दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांवर चर्चेत होती. अखेर जयंत पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज (१५ जुलै) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान जयंत पाटील हे नाराज असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्याही अनेकदा उठल्या आहेत. आताही या चर्चांना उधाण आले. यावर आता जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.
विधिमंडळात सोमवारी (१४ जुलै) माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, मंगळवारच्या बैठकीनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहेच. तसेच भाजपा प्रवेशाबाबत ज्या वावड्या उठल्या आहेत, त्याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, “भाजपात प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेले नाही आणि मी कुणाला विनंतीही केली नाही. एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या एवढ्या वावड्या उठण्याचे कारण काय? मी कुठे जाणार? हे माध्यमांनीच ठरवून टाकले. याचे मला आश्चर्य वाटते.”
“आपण पक्ष बदलणार असल्याच्या बातम्या नेहमीच माध्यमामधून दिल्या जातात. पण मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करत आहे. मी पक्ष बदलाच्या बातम्यांना कधी खोडून काढत नाही. कारण माध्यमे अशा बातम्या सारख्या देत असतात. कालांतराने या बातम्या मागे पडतात. त्यामुळे प्रत्येकवेळी बातमी आल्यानंतर त्यावर उत्तर देत बसणे मला संयुक्तिक वाटत नाही”, असेही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान आज विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना चिमटा काढला. जयंत पाटील यांना हल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना आवडू लागल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करत सरकारी योजनेतील डीबीटीवर पंतप्रधानांनी भर दिल्याचे सांगितले. असे असताना बाधंकाम कामगार मंडळातर्फे महाराष्ट्रभर पेटी, भांडी वाटली जात आहेत. हा धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलीकडे जयंत पाटील यांना मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या आहेत.