scorecardresearch

“फक्त मंत्री नव्हे तर मोदींनाही बदलण्याची गरज”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला

“फक्त मंत्री नव्हे तर मोदींनाही बदलण्याची गरज”; नाना पटोलेंचा हल्लाबोल
(नाना पटोले – पंतप्रधान नरेंद्र मोदी )

इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज असल्याची टीका पटोले यांनी केली.

नाना पटोले म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे”

अत्याचारी सरकारमुळे जनतेचे जगणे मुश्कील

पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे जुलमी, अत्याचारी सरकारमुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेजारच्या देशात भारत ३० रुपयांनी पेट्रोल व २२ रुपयांनी डिझेल देते आणि आपल्याच लोकांना १०० रुपयांना का? हे अन्यायी मोदी सरकार उखडून फेकण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सामान्य जनतेसाठी संघर्ष करत आहे.

हेही वाचा- “अमित शाह सहकार मंत्री झाले याबद्दल त्यांचं स्वागतच, पण…!” जयंत पाटलांनी लगावला अप्रत्यक्ष टोला!

राज्यात काँग्रेसची सायकल यात्रा

नवी मुंबईमध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सायकल यात्रा काढण्यात आली. पुण्यात प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कँप ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. तसेच  औरंगाबाद येथे शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी, औरंगाबाद जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात उंट, बैलगाडी आणि घोड्यांचाही सहभाग होता.

हेही वाचा- “शिवेसना-राष्ट्रवादीकडून पुरवठा झाला म्हणूनच भाजपाला मंत्रिमंडळात चेहरे मिळाले”

उद्या पुण्यात आंदोलन

महागाई विरोधातील काँग्रेसच्या १० दिवसांच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात उद्या शुक्रवारी प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनात उद्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-07-2021 at 18:24 IST

संबंधित बातम्या