‘शोध मराठी मनाचा’ संमेलनात आशुतोष गोवारीकर यांची खंत
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे असूनही या क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. राजस्थान, केरळ या राज्यांनी पर्यटन क्षेत्रात मोठी आघाडी घेतली असताना त्या तुलनेत अधिक क्षमता असूनही महाराष्ट्र मागे राहिला. या
क्षेत्राच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिल्यास महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला वेगळा आयाम मिळू शकेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी केले. जागतिक मराठी अकादमी आणि कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान यांच्या वतीने येथे आयोजित दहाव्या ‘शोध मराठी मनाचा’ संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी या संमेलनाचे अध्यक्ष गोवारीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाकवी कालिदास कला मंदिरात झालेल्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक जब्बार पटेल, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ‘झी – २४ तास’चे संपादक उदय निरगुडकर, महापौर अॅड. यतीन वाघ, स्वागताध्यक्ष आ. डॉ. अपूर्व हिरे, रवींद्र सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या सोहळ्यास उपस्थित राहणार होते. परंतु, ते काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. यावेळी गोवारीकर यांनी महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राच्या अनास्थेवर खंत व्यक्त केली. पर्यटकांना आकर्षित करू शकतील, अशी अनेक ठिकाणे येथे उपलब्ध आहेत. परंतु, त्या स्थळांचा विकास त्या दृष्टिकोनातून करण्यात आला नाही. चित्रपटांच्या शूटिंगसाठी निर्माते राजस्थान, केरळ, जम्मू-काश्मीर या राज्यांना पसंती देतात. कारण, संबंधित राज्यांनी पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यास अनुकूल अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जोधा-अकबरसह काही चित्रपटांच्या शूटिंगसाठी आपणास गुजरात व राजस्थानमध्ये जावे लागले. ‘लगान’चे चित्रीकरण आपण पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांत केल्याचे त्यांनी सांगितले.
या सत्रानंतर गोवारीकर यांची रामदास फुटाणे यांनी घेतलेली मुलाखत चांगलीच रंगतदार ठरली. विज्ञान शाखेची पदवी मिळविल्यानंतर अनेक विषयांवर प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले. चित्रपटांची आवड असल्याने अभिनयात आपण करिअर करू असे वाटत होते. परंतु, एकदा प्रत्यक्ष रंगभूमीवर संवाद विसरलो आणि हा विषय आपण बाजूला ठेवला. शेवटी काहीच झाले नाही म्हणून चित्रपटांच्या अभ्यासाच्या जोरावर दिग्दर्शन क्षेत्रात उतरलो, असे गोवारीकर यांनी नमूद केले. या मुलाखतीनंतर ‘समुद्रापलीकडे भाग एक’ यात दुबईतील अशोक कोरगावकर, सुभाष दामले आदी उद्योजकांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी डॉ. उदय निरगुडकर यांची ‘यशस्वीतेची परिभाषा’ या विषयावर संजीव लाटकर यांनी मुलाखत घेतली. त्यानंतर दिल्लीतील सार्वजनिक उत्सव समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2013 रोजी प्रकाशित
महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांच्या विकासाकडे दुर्लक्ष
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे असूनही या क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. राजस्थान, केरळ या राज्यांनी पर्यटन क्षेत्रात मोठी आघाडी घेतली असताना त्या तुलनेत अधिक क्षमता असूनही महाराष्ट्र मागे राहिला. या
First published on: 06-01-2013 at 02:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neglecting the development of maharashtras tourisum spots