राहाता : शेजारचा कारखाना कामगारांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील माहिती गोळा करत होते. त्यामुळे बेसावध असलेल्या संगमनेरमधील या शत्रुच्या घरात घुसून त्यांना पराभूत करणे सोपे झाले, असा टोला विखे कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांना लगावला. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे आमच्या मनात आता कोणतेही शत्रुत्व नसून आमची लढाई ही व्यक्तीशी नव्हे तर विचारांशी होती, अशी टिप्पणी विखे यांनी केली. गणेश कारखान्यात आणि लोकसभेचा पराभव झाल्यानंतरही शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठे मताधिक्य देऊन राधाकृष्ण विखे यांना विधानसभेत पाठवल्याचा उल्लेख त्यांनी केला.

आश्वी बुद्रुक येथे डॉ. विखे पाटील कारखान्याच्या नूतन संचालकांच्या सत्कार सोहळ्यात सुजय विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शाळिग्राम होडगर होते. विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.शेजारील संगमनेर कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोनशे अर्ज, नाराजीनाट्य, संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कै. बाळासाहेब विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत २१ जागांसाठी एकवीसच अर्ज आले. त्यामुळे सभासदांनी दाखवलेल्या मोठेपणामुळे आपल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. तर, २०२९ ला विधानसभेसाठी मतदान मागण्यापूर्वी निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून मतदारसंघातील एक स्क्वेअर फूट जागा देखील आपण वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोजापूर चारी आणि साकुर उपसा योजनेचे भूमिपूजन करणार नाही, तोपर्यत संगमनेर तालुक्यात सत्कार स्वीकारणार नसल्याचा पुनरुच्चार डॉ. विखे यांनी केला. खळी, पिंप्री – लौकी, अजमपूर, अंभोरे, पिपरणे, घारगाव भागाला लवकरच पाईप टाकून निळवंडे कालव्याचे पाणी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.