पक्षपरंपरा माहीत असल्याने ‘त्या’ मागणीकडे दुर्लक्ष!
औरंगाबाद : मी कधीही मुख्यमंत्रिपदावर दावा केला नाही. १५ वर्षांपासून राजकारणात आहे. भारतीय जनता पक्षातल्या प्रक्रिया, प्रथा आणि परंपरा या मला अवगत आहेत. पक्षाची निर्णयप्रक्रिया माहीत आहे. त्यामुळे सावरगाव घाट येथे मेळाव्यादरम्यान पंकजाताईंना मुख्यमंत्री करा, या काही जणांच्या मागणीकडे दुर्लक्ष करते, असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी दिले.
औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत पंकडा मुंडे बोलत होत्या. ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे विधानही मी कधी केले नव्हते. मात्र, ते माझ्या तोंडी घालण्यात आले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विनोद तावडे असे म्हणाले होते की, पंकजा मुंडेंमध्ये एवढी क्षमता आहे की, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यानंतर अनेकदा हा विषय माझ्या तोंडी घालण्यात आला. मात्र, मी तशी दावेदारी कधीही केली नाही. जे लोक मी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी करत होते, त्यांना थांबवणे माझ्या हाती नाही; पण गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, याबाबतची स्वयंस्पष्टता त्यांनाही होती आणि मलाही होती, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी अमित शहा यांच्यासमोर केली होती. या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही प्रचारात सहभागी होणार असल्याने भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचे वजन वाढले आहे काय, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ‘‘भाजपमध्ये वजन वगैरे असे काही नसते.’’
‘राज्याच्या राजकारणाची सूत्रे परळीतूनच’
मुख्यमंत्रीपदाची दावेदार कधीच नव्हते, असे पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे स्पष्ट केले असले तरी बीडमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांनी मात्र राज्याच्या राजकारणाची सूत्रे भविष्यात परळीमधूनच हलू शकतात, असे वक्तव्य केले आहे. भाजप युतीलाच स्पष्ट बहुमत मिळेल आणि मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असेही त्या बीड येथील पत्रकार परिषदेत म्हणाल्या.