अकोला जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण संख्या वाढीचे सत्र सुरूच आहे. शहर व जिल्ह्याच्या विविध भागातील तब्बल ४२ नवीन रुग्णांचा करोना तपासणी अहवाल शुक्रवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ५५८ वर पोहोचली. जिल्ह्यात आतापर्यंत २९ जणांचे बळी गेले. सध्या १४१ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला शहरासह जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने होणारी वाढ अद्यापही नियंत्रणात आली नाही. शुक्रवारी दिवसभरात आणखी ४२ रुग्णांची नोंद झाली. या अगोदर २७ मे रोजी सर्वाधिक ७२ व त्याआधी ८ मे रोजी ४२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा आज एकाच दिवसांत तब्बल ४२ नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील एकूण २७६ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २३४ अहवाल नकारात्मक, तर ४२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत ३८८ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये गत २४ तासांत रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या ३९ रुग्णांचा समावेश आहे.

आज सकाळच्या अहवालानुसार सकारात्मक आलेल्या आठ रुग्णांमध्ये सहा पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. तेल्हारामधील इंदिरा नगर व बेलखेड येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. उर्वरित जठारपेठ, कौलखेड, गोरक्षण रोड, जुने शहर, न्यू खेतान नगर व हरिहर पेठ भागातील रहिवासी आहेत. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी ३४ रुग्णांची भर पडल्याने आज दिवसभरात एकूण ४२ रुग्ण वाढले. सायंकाळी सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १९ पुरुष व १५ महिला आहेत. यात गायत्री नगर येथील सात, कौलखेड येथील चार, रामदासपेठ, मोठी उमरी, सोनटक्के प्लॉट, रजतपूरा, अकोट फैल, जुने शहर येथील प्रत्येकी दोन, तर न्यू तारफैल, हिंगणा रोड, बार्शिटाकळी, कैलास टेकडी, खैर मोहम्मद प्लॉट, मोमीनपूरा, काला चबुतरा, खदान, सिंधी कॅम्प, रेल्वे स्टेशन व गोकूळ कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहेत. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रासह शहरात सर्वत्र घरोघरी आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. रुग्णवाढीच्या मोठ्या संख्येमुळे अकोल्यातील चिंताजनक स्थिती कायम आहे.

एक रुग्ण नागपूरला ‘रेफर’
अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका करोनाबाधित रुग्णाला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. त्या रुग्णाची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती आहे. सर्वोपचार रुग्णालयात १३५ रुग्णांवर उपचार सुरू असून, एकला नागपूरला, तर तीन जणांवर मूर्तिजापूर येथे उपचार सुरू आहेत. कोविड केअर केंद्रामध्ये एक जण दाखल आहे. असे एकूण १४१ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

विभागीय आयुक्तांकडून आढावा
जिल्ह्यातील करोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आज विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आढावा घेतला. करोना विषाणू प्रादुर्भाव वाढण्याची कारणे, जिल्ह्यातील उपचार सुविधा व विलगीकरणाच्या सुविधा, वैद्यकीय उपचार यंत्रणेतील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, सुरक्षासाधनांची आवश्यकता आदींची माहिती त्यांनी घेतली. उपचार पद्धती संदर्भात मेडिकल कौन्सिलकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अवलंब करा, मुंबई-पुणे यासारख्या शहरांमधून परतलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवा यासह विविध सूचना त्यांनी केल्या.

जि.प.चे १५ डॉक्टर ‘जीएमसी’त सेवा देणार
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विभागीय आयुक्तांची दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या १५ वैद्याकीय अधिकाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्याालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी काढले. उद्यापासून ते डॉक्टर ‘जीएमसी’मध्ये सेवा देणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New 42 patients in akola 558 cases till date scj
First published on: 29-05-2020 at 20:44 IST