शुक्रवारी प्राप्त झालेल्या येथील चौदा करोनाबाधित रुग्णांपैकी दोघे रुग्ण हे बाधित क्षेत्राबाहेरील असल्याचे आढळून आल्याने करोनाविरुध्द लढा देणाऱ्या प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दरम्यान येथील जीवन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका करोना संशयिताचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे.
सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतांना सकाळी मृत पावलेले एक वृद्ध डॉक्टर तसेच गेल्या तेरा तारखेला मृत्यू झालेल्या महिलेसह अन्य बारा जणांचा शुक्रवारी रात्री आलेला करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे येथे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. तसेच आतापर्यंत शहरात आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ६२ वर पोहोचली आहे.
गेल्या आठवडाभरात आढळून आलेले करोनाबाधित रुग्ण हे आधीच्या रुंग्णांचे नातेवाईक व संपर्कात आलेले असेच आहेत. आता प्राप्त झालेल्या चौदा अहवालांपैकी बारा जण हेदेखील आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच बाधित क्षेत्रातील असल्याचे आढळून आले आहे. या सर्वांचे संस्थात्मक अलगीकरणही केले गेलेले होते. मात्र अन्य दोघे रुग्ण बाधित क्षेत्राबाहेरील आढळून आले आहेत. यात एक ४२ वर्षीय पुरुष आणि ५५ वर्षीय मृत्यू पावलेल्या महिलेचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील अन्य भागातही करोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून त्यादृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.