बेताल वक्तव्याची राष्ट्रवादीकडून गंभीर दखल  
राज्याचे पाणी पुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी येथे केलेल्या बेताल वक्तव्याची गंभीर दखल राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतली असून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची गच्छंती अटळ आहे, असे आता पक्षातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.
 पाच दिवसापूर्वी जिल्ह्य़ातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आले असताना ढोबळे यांनी एका पत्रकार परिषदेत राज्यातील आघाडी सरकारला चक्क नापास करून टाकले. यावेळी त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या बरेच वादंग माजले आहे. काल सोमवारी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका बैठकीत सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत ढोबळे यांनी येथे केलेल्या वक्तव्यावरून बरीच चर्चा झाल्याची माहिती आता समोर आली आहे. पक्षाचे मंत्रीच या पद्धतीने अपयश जाहीर करत असतील तर जनतेसमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा मुद्दा पक्षाच्या इतर काही मंत्र्यांनी यावेळी उपस्थित केल्याचे कळते. यावर ढोबळे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे म्हणणे कुणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. ढोबळे यांच्या मुक्त चिंतनाचा फटका अनेकदा पक्षाला बसला आहे. तरी किती काळ त्यांना संधी देत राहायची, असा युक्तीवाद काही मंत्र्यांनी यावेळी केल्याचे समजते. या सर्व घटनाक्रमामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ढोबळे यांची गच्छंती अटळ मानली जात आहे.  
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून रविवारच्या पत्रकार परिषदेत नेमके काय घडले, याची माहिती जाणून घेतली. ढोबळे केवळ सरकारलाच नापास ठरवून मोकळे झाले नाहीत, तर त्यांनी येथील जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानिक आमदारांना सुद्धा लक्ष्य केले. याच ढोबळेंनी एक महिन्यापूर्वी येथेच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची व पालकमंत्री संजय देवतळे यांची स्तुती केली होती. त्यामुळे एक महिन्यातच त्यांचे मत बदलण्यास नेमके कोणते कारण घडले, अशी विचारणा आज पक्षाकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाल्याचे समजते.