निखील मेस्त्री, पालघर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंधरा तासापूर्वी जन्माला आलेल्या नवजात मुलीला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे.  नवजात बालकाला करोना झाल्याची पालघर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना समोर आली असून पुढील उपचारासाठी या बलिकेला जव्हार येथे पाठविण्यात आले आहे.

पालघर तालुक्यातील दारशेत येथील रहिवासी अश्विनी काटेला असे मातेचे नाव आहे. या मातेची पालघर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूती झाली होती. जन्माला आलेले नवजात बाळ वजनाने कमी असल्याने तिला पालघरमधील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे या बाळाची प्रतिजन चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली. माता मुदतपूर्व प्रसूत झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे त्या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. मातेची करोना प्रतिजन चाचणी मात्र नकारात्मक (निगेटिव्ह) आहे.

बालक मुलीला करोना असल्याचे समोर आल्यानंतर पालघर ग्रामीण रुग्णालयात तिला आणले गेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून जव्हार ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले आहे. बाळाची प्रकृती स्थिर असली तरी काही गुंतागुंत असलंयाने त्यावर जव्हार रुग्णालयात उपचार देणे सोयीचे जाईल असे ग्रामीण रुग्णालयात असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newborn girl infected corona rushed jawahar hospital treatment ssh
First published on: 31-05-2021 at 22:24 IST