उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेली महिला लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चक्क डॉक्टरांनीच मांत्रिकाला पाचारण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर रुग्णालयानं मात्र असं काही झालं नसल्याचा निर्वाळा दिला आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या एका महिला रुग्णासंदर्भात हा प्रकार घडला आहे. सदर महिला मृत्यू पावली असून तिच्यावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छातीत गाठ झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या या महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. संध्या सोनवणे असं या महिलेचं नाव आहे. या महिलेला आधी स्वारगेट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तब्येत खालावल्याने त्यांना दीनानाथमध्ये हलवण्यात आले आणि आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्यावर जादुटोणा करण्यासाठी मांत्रिकाला पाचारण करण्यात आल्याचा आरोप तिच्या भावानंच केला आहे. डॉक्टर सतीश चव्हाण यांनी या मांत्रिकाला आणल्याचं व नजर उतरवण्यासाठी उतारा काढल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, बहिणीची तब्येत महत्त्वाची असल्यानं आपण त्याबाबत काही बोललो नाही असं या महिलेच्या भावानं पत्रकारांना सांगितलं. यासंदर्भातला हा व्हिडीयोही व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती हातात फुल घेऊन ती त्या महिलेच्या अंगावरून उतारा केल्यासारखी फिरवताना दिसत आहे. तसंच या व्हिडीयोमध्ये नजर उतरवल्याचा संदर्भ अस्पष्ट ऐकायला येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: News of black magic in dinanath mangeshkar hospital of pune
First published on: 13-03-2018 at 15:05 IST