ते आले.. त्यांनी पाहिले.. त्यांनी फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांचेच म्हणणे ऐकून घेतले आणि ते निघून गेले.. असेच वर्णन भोपाळमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या महिला प्रतिनिधींच्या बैठकीचे करता येईल. राहुल यांच्यासमोर आपली मते परखडपणे मांडता येईल अशा भुलथापा देत देशभरातील २५ राज्यांच्या स्वयंसेवी संस्थांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या बैठकीत केवळ काँग्रेसच्या महिला प्रतिनिधींनी राहुल यांच्याभोवती कोंडाळे करत त्यांचेच स्तुतिगान केले. त्यामुळे देशभरातून आलेल्या महिला प्रतिनिधींचा भ्रमनिरास झाला.
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा करण्याआधी देशभरातील महिला प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी खास राहुल यांच्याच सूचनेवरून भोपाळमध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. काँग्रेसला विरोध असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना मुद्दामच त्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. राज्यातून अंजली दवे, नंदिता शाह, शारदा साठे, जिविका, अॅड. पारोमिता गोस्वामी, फ्लेबिया अॅग्नेस यांच्यासह काही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां बैठकीसाठी भोपाळला गेल्या होत्या. बैठकीचे अध्यक्षस्थान स्वत राहुलच भूषवतील असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात सकाळच्या दोन सत्रात राहुल आलेच नाहीत. कृष्णा तिरथ, वर्षां गायकवाड व रेणुका चौधरी यांनीच उपस्थित महिला प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. सत्राच्या अखेरीस ‘महिलांचे राजकीय उत्थान’ या विषयावर प्रतिनिधींना राहुल यांच्यासमोर मते मांडण्याची संधी मिळणार असल्याचे गाजर दाखवण्यात आले. मात्र, राहुल यांचे आगमन होताच आयोजकांनीच त्यांच्याभोवती कोंडाळे केले. सत्राचा बोऱ्या तर वाजलाच शिवाय काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या महिलांनाच राहुल यांच्यासमोर बोलण्याची संधी देण्यात आली. संबंधितांनीही मूळ मुद्दा बाजूला ठेवून राहुल यांचीच भाटगिरी केली. राहुल पंतप्रधानपदासाठी कसे योग्य आहेत वगैरे सांगण्याचा प्रयत्नच या प्रतिनिधींनी केला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अंगणवाडी सेविकांचे, तसेच विधवांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनासंबंधीचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, पण तेथे हजर असलेल्या महिला नेत्यांनी तो हाणून पाडला. यामुळे संतप्त झालेल्या मुंबईच्या फ्लेबिया अॅग्नेस यांनी अखेर जबरदस्तीने ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन म्हणणे मांडले, अशी माहिती या बैठकीवरून परतलेल्या श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांनी दिली. केवळ पक्षात सक्रिय असलेल्या महिलांचेच म्हणणे ऐकायचे होते तर स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांना कशासाठी बोलावले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सर्व गदारोळात राहुल यांनी तेथून हळूच काढता पाय घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
राहुलच्या बैठकीत स्वयंसेवी प्रतिनिधी मूकदर्शकच
ते आले.. त्यांनी पाहिले.. त्यांनी फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांचेच म्हणणे ऐकून घेतले आणि ते निघून गेले.. असेच वर्णन भोपाळमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या महिला प्रतिनिधींच्या बैठकीचे करता येईल.
First published on: 24-01-2014 at 05:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ngo representatives remain silent spectator in rahul gandhi meeting