काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप सावंत यांच्या अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झालेले माजी खासदार नीलेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनामध्ये वाढ करण्यास सोमवारी न्यायालयाने नकार दिला. आजच्या सुनावणीदरम्यान खेड सत्र न्यायालयाने यासंदर्भातील निलेश राणेंचा अर्ज फेटाळून लावला. तसेच उर्वरित चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी निलेश राणे यांना देश सोडून जाण्यास न्यायालयाने मनाई केली होती.
सावंत यांचे गेल्या २४ एप्रिल रोजी चिपळूण येथील त्यांच्या घरातून अपहरण करून मुंबईला नेऊन मारहाण केल्याचा गुन्हा नीलेश, त्यांचे अंगरक्षक मनिष सिंग, जयकुमार पिलाई, स्वीय सहाय्यक तुषार पांचाळ आणि कुलदीप उर्फ मामा खानविलकर यांच्याविरूध्द नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी नीलेश यांनी यापूर्वीच येथील जिल्हा न्यायालयातून हंगामी अटकपूर्व जामीन मिळवला होता.