Nilesh Rane Supports Brother Nitesh while conflict with Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मात्र, या आंदोलनावर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी टीका केली होती. जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडली जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच आमदार रोहित पवार हे जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवत असल्याचा आरोपही केला होता. नितेश राणे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, “चिचुंद्रीचे पाय कोणी मोजलेत का? तसेच चिचुंद्री नुसती ओरडत असते, ती काय बोलते हे कोणालाच कळत नाही.”

नितेश राणे म्हणाले होते की “या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली जात असून रोहित पवार यांची माणसं आंदोलकांना मदत करत आहेत.”

नितेश राणेंबद्दल मनोज जरांगे काय म्हणाले होते?

नितेश राणेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले होते की “चिचुंद्रीचे पाय कधी मोजलेत का? चिचुंद्री लाल असते, तिला चार पाय असतात, ऊन असो अथवा पाऊस ती लालच राहते. ती काय बोलते ते कोणालाच कळत नाही. मात्र ती सतत ओरडत असते. मी त्या चिचुंद्रीबद्दल सध्या काही बोलणार नाही. आपलं हे आंदोलन संपू द्या. मग मी त्यांच्याकडे बघतो. मी निलेश राणे यांना सांगत होतो की यांना आवरा पण आता मीच आंदोलन झाल्यावर त्यांच्याकडे बघतो.”

भावाला चिचुंद्री म्हटल्यावर निलेश राणेंचा संताप

मनोज जरांगे यांनी नितेश राणे यांना चिचुंद्री म्हटल्यावर आमदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबूकवर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “नितेश राणे एखाद्या विषयावर बोलल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही किंवा वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो.

मी आजपर्यंत नातं जपलं, तुमच्याकडूनही तीच अपेक्षा : निलेश राणे

आमदार निलेश राणे म्हणाले, “आमच्या परिवारातील सदस्यावर कोण हात टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही, म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे. कारण आम्ही तुम्ही काही परके नाही. विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे. मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले आहेत, कौटुंबिक राहिले आहेत, ते तसेच राहिले पाहिजेत. मी आजपर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन… आपल्याकडून पण तीच अपेक्षा आहे.”