कोल्हापूर : निपाणी येथील काँग्रेसचे माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी सीमालढ्यात योगदान दिले होते.
पाटील यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषदेतून सुरू झाली. सीमालढ्यात सहभागी असणाऱ्या पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक महाराष्ट्र एकीकरण समितीकडून लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सलग तीन वेळा विजय मिळवलेला होता. काळम्मावाडी धरण पाणी करार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. महाराष्ट्र व कर्नाटकातील नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. जनमानसात राहणाऱ्या या नेत्याचे वक्तृत्व, नेतृत्व उल्लेखनीय स्वरूपाचे होते.
दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना बेळगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. आज त्यांचे निधन झाल्यावर कष्टकऱ्यांचा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत राहिली. त्यांच्या मागे मुलगा सुजय, सून, मुलगी असा परिवार आहे. अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते.