सावंतवाडी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२४-२५ अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत (Black List) टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.कृषी विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील आणि क्षेत्रीय तपासणीचा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे राणे यांनी कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची आणि आगामी वर्षासाठी (२०२५-२६) या कंपनीऐवजी दुसऱ्या विमा कंपनीची नेमणूक करण्याची सूचना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत राणे यांनी ही नाराजी व्यक्त केली. या बैठकीला भारतीय कृषी विमा कंपनीचे राज्यस्तरीय प्रतिनिधी अनुपस्थित असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ऋषिकेश गावडे आणि स्कायमेट वेदर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.