आज नितेश राणेंना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलिसांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. तर नितेश राणे यांच्या बाजूने अॅड.सतिश मानेशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. यानंतर कणकवली न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली असून नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबद्दल अॅड.सतिश मानेशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणी आजच जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर आता उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती राणे यांचे वकील सतिश मानेशिंदे व संग्राम देसाई यांनी दिली. त्याचबरोबर नितेश राणेंची तब्येत बरी नसल्याचंही वकिलांकडून सांगण्यात आलं.
नितेश राणे प्रकरणातल्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
याबद्दल बोलताना नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई म्हणाले, “नितेश राणेंची तब्येत आधीपासूनच बरी नव्हती. पण ठरल्याप्रमाणे, न्यायालयाच्या आदेशामुळे ते पोलीस कोठडीत गेले होते. पण आता नियमित तपासणी होईल, त्यात डॉक्टरांना जे आढळून येईल, त्यानुसार पुढची कार्यवाही होईल. नितेश राणेंच्या उपचारासाठी आम्ही कोर्टाकडे कोणताही अर्ज केलेला नाही. आम्ही फक्त न्यायालयात नमूद केलं आहे की त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांना उपचाराची गरज वाटली तर उपचार केले जातील. नाही वाटलं तर काही हरकत नाही. न्यायालयाला माहिती द्यायचं आमचं काम होतं, ते आम्ही केलं”.
पोलिसांच्या कोठडीची मदत वाढवण्याच्या मागणीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, पोलिसांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे. १८ डिसेंबरपासून हे तपास सुरू आहे. नितेश राणेंनी चारवेळा पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे त्यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये अशी त्यांनी मागणी केली तसेच फिर्यादीचा फोटो मोबाईलद्वारे पाठवला नाही पण मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुण्यात कट रचला असे पोलिसांचे म्हणणे दिशाभूल करणारे आहे.
काय आहे हे प्रकरण? सविस्तरपणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कणकवली करंजे येथील शिवसैनिक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे बँक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडे आमदार नितेश राणे व पीए राकेश परब आदींची नावे समोर आली होती त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती.