साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीचे मूळ ऐतिहासिक बांधकाम वगळून उर्वरित बेकायदा बांधकाम गुरुवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं. राज्य सरकारने गोपनीयता राखत ‘शिवप्रताप दिनी’ ही कारवाई केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचे मूळ थडगे अगदी छोट्या स्वरूपाचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याच्याभोवती नव्याने मोठे बांधकाम, राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या होत्या. अखेर ‘शिवप्रतापदिनी’च शिंदे-फडणवीस सरकारने ही कारवाई करत हे अवैध बांधकाम हटवले.
यानंतर आज ( ११ नोव्हेंबर ) कबरीजवळील अतिक्रमण हटवल्याबद्दल मुंबईत भाजपाकडून जल्लोष करण्यात आला. तेव्हा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्याची मागणी वर्षानुवर्षे होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्ववादी सरकारने नागरिकांचे डोळे झोपेतून उघडण्याच्या आधी अतिक्रमण हटवले,” असे नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा : “शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला”, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका; म्हणाले, “आता सत्तेत…”
“विशालगड, प्रतापगड आणि मुंबईतील शिवडी किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यात येईल. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण, ते नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. यांनी उद्धव ठाकरेंकडे वाकड्या नजरेने पाहिल्यामुळे अतिक्रमण हटवण्याची त्यांची हिंमत झाली नाही. उद्धव ठाकरेंना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं. हातात भगवा घेऊन कोण हिंदू होत नाही, मनाने व्हावं लागतं,” असा टोलाही नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
हेही वाचा : “तलवार आणाच पण…” विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर सडकून टीका, युवकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यात तुमचं सरकार असून, अफजलखानची कबर हटवणार का? असा प्रश्न नितेश राणेंना विचारला. त्यावर “कबर हटवण्याच्या अगोदर तुम्हाला सांगणार नाही. झोपेत असताना अतिक्रमण हटवलं, त्याच पद्धतीने कबरही हटवण्यात येईल. अफजलखान आणि औरंगाजेबच्या आठवणी महाराष्ट्रात कशाला पाहिजेत. त्यांनी इतिहासाला गालगोट लावण्याचं काम केलं. कबर हटवण्याची तारीख आणि वेळ न सांगता जाहीर करू,” असेही नितेश राणेंनी स्पष्ट केलं.