केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या विकासाभिमुख प्रकल्पांसाठी आणि निरनिराळ्या अभिनव कल्पनांसाठी ओळखले जातात. रस्ते बांधणी व वाहतूक व्यवस्थापन प्रकल्पांमधलं त्यांच काम नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्याशिवाय नितीन गडकरी राजकीय विषयांवरही स्पष्टपणे भूमिका मांडताना दिसतात. त्यांच्या या भूमिकांची बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता त्यांच्या आणखी एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे.
मुंबईच्या पार्ले भागात गुरुवारी लोकमान्य सेवा संघातर्फे ‘लोकमान्य गप्पा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नितीन गडकरींची सविस्तर मुलाखत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी घेतली. या मुलाखतीत नितीन गडकरींनी विविध विषयांवर आपली सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी देशातील राजकीय स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
“देशात विचारशून्यता ही समस्या”
“आज दुर्दैवाने ना उजवे, ना डावे, आपण संधीसाधू हेच राजकारणातलं सूत्र आहे. कोण कुठल्या पक्षात कधी घुसतात, कधी बाहेर जातात, कुठे जातात हे कुणीच सांगू शकत नाही. देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सगळ्याच क्षेत्रातली समस्या आहे”, असं गडकरी म्हणाले.
“ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी”
“मी सर्व बाबतीत पब्लिक-प्रायव्हेट गुंतवणुकीला प्रोतासहन दिलं. आधी सरकारनंच सगळं करायचं होतं. पण मी नेहमी म्हणतो, ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी. सरकार म्हणजे विषकन्या आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार असू देत. ज्या कामाला हात लावतात, ९९ टक्के कामं, अगदी सोन्याच्या खाणीही तोट्यात आणतात. पण पब्लिक-प्रायव्हेट व्यवस्थेनं विकासाचा दर वाढतो, नफा वाढतो, रोजगार निर्माण होतो, गरिबी कमी होतेय”, असं गडकरी यावेळी म्हणाले.
“टाटा, अंबानी मला म्हणाले, तुम तो हमसे आगे निकल गए”
यावेळी बोलताना नितीन गडकरींनी एक आठवण सांगितली. “मुंबई-पुणे एक्स्प्रेस बांधताना बाँड्सच्या माध्यमातून ५०० कोटींचा निधी उभारण्यासाठी प्रयत्न करत होतो. मला ११५० कोटी मिळाले. दुसऱ्या वेळी पुन्हा ५०० कोटींसाठी प्रयत्न केले तर १२०० कोटी मिळाले. तेव्हा धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा मला म्हणाले होते, तुम तो हम से भी आगे निकल गए”, असं गडकरींनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.