राहाता : सहकार चळवळीचे खासगीकरण झाल्यामुळे ही चळवळ संपुष्टात आली. या प्रवृत्तीमुळे अनेक सहकारी संस्था आजारी होत पुढे बंद झाल्या, अशी खंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण पुढील आयुष्य खर्च करणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी लोणी येथे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, काशिनाथ दाते, विठ्ठल लंघे, विक्रमसिंह पाचपुते, अमोल खताळ, तसेच प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे, डॉ. सुजय विखे, शालिनी विखे, सुवर्णा विखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विंधन विहीर देण्याची योजना होती, परंतु या सरकारी योजना केव्हा येतात व केव्हा जातात, हे कळत नाही अशी अप्रत्यक्ष टीका गडकरी यांनी सरकारवर केली. मंत्री विखे यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याची सिंचन क्षमता ६० ते ६५ टक्क्यांनी वाढवावी, असे आवाहन करून गडकरी म्हणाले, की शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी.
ज्ञान हीच शक्ती समजून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळीचा आधार घेऊन उभे केलेले काम सामाजिक, आर्थिक समता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरले. याच विचाराने ग्रामीण विकासाचा निर्देशांक २६ टक्क्यांपर्यंत आपल्याला न्यावा लागेल. लोकनेते विखे पाटील यांनी आपल्या गुणात्मक कार्यातून वेगळे स्थान निर्माण केले. या पाठीमागे त्यांचा त्याग होता, लोकांशी बांधिलकी होती. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव व बाळासाहेब यांच्या कार्यातील विचार प्रेरणादायी असल्यानेच अशा व्यक्तींना यश मिळते. या भागात सहकारातून शैक्षणिक प्रकल्प उभारून त्यांनी ग्रामीण भागाचा सुखांक वाढविण्याचा प्रयत्नही केल्याचे गडकरी यांनी सांगितले.
मंत्री विखे म्हणाले, ‘आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यास गडकरी यांनी यावे ही इच्छा होती. कारण बाळासाहेब विखे आणि त्यांचा स्नेह राजकारणापलीकडचा होता. हे आत्मचरित्र म्हणजे पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीतील एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. त्यांच्या नावाने आता देशपातळीवर सहकार, कृषी, शिक्षण आणि जलसंवर्धनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या समितीचे अध्यक्षपदही गडकरी यांनी स्वीकारले आहे. या प्रसंगी माजी मंत्री म्हस्के यांचे भाषण झाले. डॉ. सुजय विखे यांनी प्रास्ताविक केले.