फुटीरवादी नेता मसरत आलम याची सुटका करण्याच्या मुद्दय़ावरून भाजपने पीडीपीला निर्वाणीचा इशारा दिल्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. काश्मिरात जे सुरू आहे ते योग्य नाही व देशभरात याबाबत असंतोष आहे असे सांगतानाच राष्ट्रवादी शक्तींनी सत्तेत राहून आघाडीला संधी दिली पाहिजे अशी भूमिकाही संघाने घेतली आहे.
संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा शुक्रवारपासून नागपुरात सुरू झाली. त्यानिमित्त बोलताना संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी काश्मीरसह विविध मुद्दय़ांवर संघाची भूमिका मांडली. मसरत आलम प्रकरणावरून देशात असंतोष आहे तसाच तो भाजपमध्येही आहे. पक्ष व पंतप्रधानही यावर बोलले आहेत. काश्मिरात जे सुरू आहे ते योग्य आहे असे आम्ही मानत नाही. पीडीपी व भाजप यांनी काही मुद्दय़ांवर युती केली आहे व अशा आघाडय़ांचा धर्म असतो. या आघाडीत पहिल्या दिवसापासून अडचणी निर्माण होत आहेत व ही आघाडी हा एक प्रयोग आहे. या दोन पक्षांमध्ये ताळमेळ आहे की नाही व गाडी व्यवस्थित चालते आहे किंवा नाही हे भाजप ठरवेल. मात्र, हा फक्त दोन पक्षांचा प्रश्न नसून संपूर्ण देशाच्या भावनेचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी विचाराच्या पक्षांनी सत्तेत राहायला हवे व या आघाडीला एका संधी द्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संघ परिवारातून केंद्र सरकारच्या काही धोरणांवर टीका होत असली तरी संघ मोदींच्या पाठीशी असल्याचे होसबळे यांनी सूचित केले. असमाधान व्यक्त करावे असे केंद्र सरकारने काहीही केलेले नाही व समाधान व्यक्त करावयास ५ वष्रे वाट बघावी लागेल, असे होसबळे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्पसंख्याक ही संकल्पना संघाला मान्य नाही. या देशात जन्मलेले सगळे लोक हिंदू आहेत हेच आमचे मानणे आहे व सरसंघचालकांनी ते मांडले आहे. संघ कोणत्याही घरवापसी अभियानात सहभागी नाही. जे लोक हे करीत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा.
 – दत्तात्रय होसबळे, सहसरकार्यवाह

More Stories onआरएसएसRSS
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No change in stand on article 370 in jammu and kashmir rss
First published on: 14-03-2015 at 05:45 IST